पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!
Pune Metro दोन्ही स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू; आयटी हब, व्यावसायिक संकुले आणि खाद्य-मनोरंजन केंद्रांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार!
Pune Metro Balewadi Stations: पुणे : पुणेरी मेट्रोच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिकेवरील प्रवाशांच्या सुविधेत आणखी भर पडली असून, बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन नवीन स्थानके बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजल्यापासून प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत. या दोन्ही स्थानकांमुळे बालेवाडी, बाणेर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मेट्रोची सुविधा उपलब्ध होणार असून, पश्चिम पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
‘झुमका पटोला’च्या 10 लाख रील्सचा टप्पा पार! शर्वरी म्हणाली, गाण्यांच्या बाबतीत मी खूप भाग्यवान
या दोन्ही स्थानकांना २४ नोव्हेंबर २०२६ रोजी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र आणि प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली. त्यानंतर ही स्थानके आज प्रवासी सेवेसाठी खुली करण्यात आली. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, महानगर मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी, मुख्य वित्त अधिकारी मितुल झवेरी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अन्य मान्यवर सहभागी झाले होते.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुण्यातील मेट्रोचे जाळे सध्या सुमारे ५५ किलोमीटरपर्यंत विस्तारले असून, आगामी काळात ते सुमारे १५० किलोमीटरपर्यंत नेण्याच्या दृष्टीने विविध मार्गांवर काम सुरू आहे. बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल होणे हा पुणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. आज मी स्वतः मेट्रोने प्रवास केला. हा अनुभव अतिशय सुखद होता. “प्रवासादरम्यान प्रवाशांशी संवाद साधला असता, त्यांनी मेट्रो सेवा आणि नव्या स्थानकांच्या प्रारंभाबद्दल समाधान व्यक्त केले. मेट्रो ही शहरांची जीवनवाहिनी बनत असून, पुणेकरांचा वाढता प्रतिसाद हे त्याचेच द्योतक आहे. “मेट्रो प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंतची जोडणी (लास्ट माईल कनेक्टिव्हिटी), वाहनतळ सुविधा आणि पीएमपीएमएल बससेवेशी समन्वय साधण्यावर भर दिला जात आहे. वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था प्रयत्नशील आहेत. तसेच मेट्रोची विमानतळाशी जोडणी करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. सविस्तर अभ्यासानंतर कल्याणीनगर-विमानतळ हा मार्ग अधिक योग्य असल्याचे समोर आले असून, त्या दृष्टीने पुढील कार्यवाही सुरू आहे.”
दुष्काळात वृद्धांना मिळतयं घरपोच पाणी! मराठवाड्यात ग्रामपंचायत शिपायाची समाजसेवा
पीआयटीसीएमआरएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी म्हणाले, “बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल होणे हे मेट्रो मार्गिका ३ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या स्थानकांमुळे परिसरातील रहिवासी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि नियमित प्रवाशांना अधिक वेगवान, सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार मेट्रो सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध असून, अधिकाधिक नागरिकांनी दैनंदिन प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा स्वीकार करावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील.”
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, “मेट्रो मार्गिका ३ हा पीएमआरडीएच्या नियोजनबद्ध आणि शाश्वत शहरी विकासाच्या व्यापक दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाल्यामुळे या मार्गावरील सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता आणि सुलभता वाढणार आहे. शहराच्या सध्याच्या वाहतूकविषयक गरजा पूर्ण करण्यासोबतच भविष्यातील वाढत्या गरजांचाही विचार करून एकात्मिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्यावर आमचा भर आहे.”
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! पुढील 3 महिने मोफत धान्य मिळणार
बालेवाडी हायस्ट्रीट स्थानकामुळे पुण्यातील प्रमुख खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाच्या केंद्रांपैकी एक असलेल्या बालेवाडी हायस्ट्रीट येथे जाणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच परिसरातील आयटी कंपन्या, व्यावसायिक संकुले आणि कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही हे स्थानक सोयीचे ठरणार आहे. याशिवाय, बालेवाडी फाटा स्थानकामुळे बालेवाडी, बाणेर आणि लगतच्या परिसरातील रहिवासी तसेच नियमित प्रवाशांना मेट्रोची अधिक सुलभ सुविधा मिळणार आहे.
पुणे मेट्रो मार्गिका ३ ही २३.३ किलोमीटर लांबीची पूर्णपणे उन्नत मेट्रो मार्गिका असून, ती माण-हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान धावते. या मार्गावर एकूण २३ स्थानके आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या प्रकल्पाच्या उभारणी आणि संचालनाची जबाबदारी पीआयटीसीएमआरएलकडे सोपविली आहे. टाटा समूह आणि सीमेन्स यांची या कंपनीत संयुक्त भागीदारी आहे.