1 नोव्हेंबरपासून सरकारी रुग्णालयांमधील मोफत रक्तचाचण्या बंद, सरकारच्या ढिसाळ कारभाराचा रुग्णांना फटका

आतापर्यंत मोफत मिळणाऱ्या रक्तचाचण्यांसाठी गरीब रुग्णांना आता खासगी प्रयोगशाळांमध्ये हजारो रुपये मोजावे लागत आहेत.

Untitled Design   2026 11 12T095752.193

Untitled Design 2026 11 12T095752.193

Free blood tests in government hospitals discontinued : राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा मोठा फटका आता राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना बसत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, महालॅब, मोफत डायलिसिस केंद्रे आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ येथे मिळणाऱ्या मोफत रक्त नमुना चाचण्या 1 नोव्हेंबरपासून बंद झाल्या आहेत. महालॅब चालवणाऱ्या कंत्राटदार कंपनीची 800 हून अधिक देयके शासनाकडे प्रलंबित असल्याने ही सेवा ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आतापर्यंत मोफत मिळणाऱ्या रक्तचाचण्यांसाठी गरीब रुग्णांना आता खासगी प्रयोगशाळांमध्ये हजारो रुपये मोजावे लागत आहेत.

या निर्णयाचा परिणाम राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांवर होत आहे. भंडारा जिल्ह्यात दररोज सुमारे एक हजार रुग्णांच्या तीन हजार विविध चाचण्या मोफत केल्या जात होत्या. मात्र, आता या चाचण्या बंद झाल्याने गरोदर माता, वृद्ध नागरिक आणि नियमित डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना उपचारांसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

आठ वर्षे शिक्षकांचे पगार थकवले, 400 कोटींची देणी, सिंहगड संस्थेच्या विश्वस्तांना हायकोर्टाचा दणका!

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्याच्या आरोग्य विभागाने एचएलएल लाईफ केअर लिमिटेड या कंपनीसोबत दहा वर्षांचा करार केला होता. या करारानुसार गेल्या सात वर्षांपासून कंपनीकडून सुमारे 400 महालॅब, 225 आपला दवाखाने आणि 110 डायलिसिस केंद्रे चालवली जात आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि सामान्य नागरिकांना सीबीसी, थायरॉईड आणि बायोकेमिस्ट्रीसारख्या महत्त्वाच्या चाचण्या मोफत उपलब्ध होत होत्या.

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सरकारकडून कंपनीची देयके थकल्याने सेवा चालवणे कठीण झाल्याचे कंपनीने सार्वजनिक आरोग्य विभागाला कळवले होते. गेल्या दोन वर्षांत तब्बल 1 हजार 67 कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याने चार हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. तसेच डायग्नोस्टिक किट्स आणि आवश्यक साहित्य खरेदी करण्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कंपनीने सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

राज्यातील सुमारे 137 लॅबमध्ये रक्त नमुना चाचण्या बंद झाल्याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे. या व्यवस्थेत राज्यभरात सुमारे 5 हजार 300 कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीची देयके रखडल्याने त्यांच्या नोकरीसह वेतनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. मोफत चाचण्या बंद झाल्याने सर्वसामान्य रुग्णांना खासगी लॅबचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, या परिस्थितीवर भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने तातडीने महालॅबची थकीत देयके अदा करून रक्तचाचण्या पूर्ववत सुरू कराव्यात आणि गरीब रुग्णांचा आर्थिक त्रास थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा मोफत देण्याच्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे आर्थिक देयके रखडल्याने महत्त्वाच्या आरोग्य सुविधा बंद पडत आहेत. त्यामुळे राज्य सरकार या प्रश्नावर तातडीने काय निर्णय घेणार आणि गरीब रुग्णांना पुन्हा मोफत चाचण्यांची सुविधा कधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version