From Vishwanath Patekar to Nana Patekar… : काही कलाकार पडद्यावर भूमिका साकारतात…काही कलाकार भूमिका जगतात… आणि काही कलाकार असे असतात, जे आपल्या अभिनयातून एक वेगळीच व्याख्या निर्माण करतात. नाना पाटेकर… असंच एक नाव. दमदार आवाज, धारदार संवादफेक, डोळ्यांतून भावना व्यक्त करण्याची विलक्षण ताकद आणि कोणतीही भूमिका अक्षरशः जगून दाखवण्याची क्षमता… या सगळ्यामुळे नाना पाटेकर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. पण ‘नाना’ होण्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता… विश्वनाथ पाटेकर ते नाना पाटेकर… हा प्रवास होता संघर्षातून घडलेल्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचा.
1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे विश्वनाथ पाटेकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. मात्र घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल होती. त्यामुळे नानांनी लहान वयातच संघर्ष अनुभवला. अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन काळातच त्यांचा रंगभूमीशी संबंध आला. आणि याच रंगभूमीने पुढे भारतीय चित्रपटसृष्टीला एक असामान्य अभिनेता दिला.
नानांनी प्रायोगिक रंगभूमीवरून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. विजया मेहता यांच्यासारख्या दिग्गज रंगकर्मींशी काम करताना त्यांच्या अभिनयाला वेगळी धार मिळाली. व्यक्तिरेखा समजून घेणं, संवादामागची भावना जाणून घेणं आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं… या सगळ्याचा पाया रंगभूमीवरच मजबूत झाला. 1978 मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र रुपेरी पडद्यावरचा सुरुवातीचा प्रवासही संघर्षमय होता. मिळेल ते काम स्वीकारत, छोट्या-मोठ्या भूमिका करत त्यांनी स्वतःची वाट तयार केली.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1986 मधील ‘अंकुश’ या चित्रपटाने त्यांना व्यापक ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘प्रतिघात’, ‘परिंदा’ आणि ‘प्रहार’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांच्या अभिनयाची ताकद अधोरेखित केली. आणि त्यानंतर सुरू झाला तो नानांच्या अभिनयातील सुवर्णकाळ… ‘परिंदा’पासून ‘क्रांतिवीर’पर्यंत…नाना पाटेकर यांची कारकीर्द कधीच एका चौकटीत अडकली नाही. खलनायक असो, नायक असो, सहकलाकार असो, विनोदी व्यक्तिरेखा असो, पोलिस अधिकारी असो, राजकारणी असो किंवा सामान्य माणूस… प्रत्येक भूमिकेत नानांनी स्वतःची वेगळी छाप उमटवली.
‘परिंदा’, ‘अंगार’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’, ‘टॅक्सी नंबर 9211’, ‘राजनीती’, ‘वेलकम’, ‘वेलकम बॅक’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. ‘परिंदा’मधील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं. ‘क्रांतिवीर’मधील भूमिकेने त्यांच्या अभिनयाला आणखी उंची मिळवून दिली. त्यांच्या अभिनय कारकिर्दीत एकूण तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं यश मिळवलं, तरी नानांचं मराठी मातीशी असलेलं नातं कधीच तुटलं नाही.
‘भालू’, ‘पक पक पकाक’, ‘देऊळ’, ‘नटसम्राट’, ‘आपला माणूस’ यांसारख्या मराठी चित्रपटांतून त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या. आणि यातील सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे…‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकर.रंगभूमीवर आयुष्य घालवलेल्या एका ज्येष्ठ अभिनेत्याचं भावविश्व, त्याचा अहंकार, त्याचं प्रेम, त्याचा एकटेपणा, त्याची अस्वस्थता आणि आयुष्याच्या उत्तरार्धातील वेदना… नानांनी गणपतराव बेलवलकरांच्या रूपाने अक्षरशः जिवंत केल्या. नानांचा अभिनय केवळ त्यांच्या व्यक्तिरेखांपुरता मर्यादित नव्हता.
एमपीएससी आंदोलनाला हायकोर्टाचा दणका; विद्यार्थ्यांच्या रस्त्यावरील आंदोलनाबाबात थेट आदेश
त्यांच्या अभिनयाची सर्वात मोठी ताकद होती, आवाज, संवादफेक, देहबोली आणि डोळ्यांतून भावना व्यक्त करण्याची विलक्षण क्षमता. त्यांचा संवाद केवळ कानावर पडत नसे… तो थेट प्रेक्षकांच्या मनात उतरायचा. त्यांच्या संवादफेकीची स्वतःची एक शैली होती. त्यामुळे नानांचा आवाज ऐकताच पडद्यावरची व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर उभी राहायची. नानांचा अभिनय अनेकदा ‘अभिनय’ वाटतच नसे. तो एखाद्या सामान्य माणसाच्या जगण्याचा थेट अनुभव वाटायचा. म्हणूनच त्यांनी साकारलेली पात्रं प्रेक्षकांना अस्वस्थ करायची, विचार करायला भाग पाडायची आणि दीर्घकाळ स्मरणात राहायची.
पण नाना केवळ पडद्यावरचे अभिनेते नव्हते… ‘नाना’ या व्यक्तिमत्त्वाला सामाजिक बांधिलकीचीही एक संवेदनशील बाजू होती. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सहकार्याने त्यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी मदतीचं काम केलं. पुरस्कारातून मिळालेली रक्कम सामाजिक कार्यासाठी देण्यापासून ते विविध आपत्तीग्रस्तांना मदत करण्यापर्यंत नानांनी आपल्या परीने सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या अभिनयाची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार यांसह अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. 2013 मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केलं. मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठीही त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. याशिवाय त्यांनी भारतीय प्रादेशिक सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल म्हणूनही सेवा बजावली. पण नाना पाटेकर यांचा जीवनप्रवास हा केवळ पुरस्कारांचा किंवा यशाचा प्रवास नव्हता. तो होता… आर्थिक अडचणींपासून सुरू झालेला संघर्ष… रंगभूमीवरील प्रयोग…छोट्या भूमिकांसाठी केलेली धडपड…मोठ्या संधींची वाट पाहणं… आणि अखेर स्वतःच्या अटींवर भारतीय चित्रपटसृष्टीत उभं केलेलं स्वतंत्र स्थान.
Gulabrao Patil : पाणीपुरवठा प्रलंबित योजना नोव्हेंबरमध्ये पूर्ण करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
नाना लोकप्रिय होते; पण लोकप्रियतेच्या मागे धावणारे नव्हते. ते स्पष्टवक्ते होते… प्रसंगी परखड होते… त्यांच्या व्यक्तिमत्त्वात राग होता, संवेदनशीलता होती, तत्त्वनिष्ठा होती आणि माणसांविषयीची आंतरिक कळकळही होती. नायक असो वा खलनायक…सामान्य माणूस असो वा ‘नटसम्राट’… नाना पाटेकरांनी प्रत्येक भूमिकेला स्वतःची ओळख दिली. आणि म्हणूनच नाना पाटेकर केवळ एक अभिनेता राहिले नाहीत… ते अभिनयाच्या एका स्वतंत्र शैलीचं नाव बनले. आज तो दमदार आवाज कायमचा शांत झाला आहे.
पडद्यावर हजारो व्यक्तिरेखा जगवणारा हा अभिनेता आता प्रत्यक्ष आयुष्यातून निघून गेला आहे. मात्र त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा, त्यांचा आवाज, त्यांची संवादफेक आणि त्यांचा अभिनय भारतीय प्रेक्षकांच्या स्मरणातून कधीही जाणार नाही. कारण काही कलाकार काळाच्या पडद्याआड जातात…पण त्यांची कला काळाच्या पुढेही जिवंत राहते. नाना गेले… पण ‘नाना’ कधीच संपणार नाही.अभिनयाच्या व्याख्येला नवा अर्थ देणाऱ्या, असंख्य व्यक्तिरेखांना अजरामर करणाऱ्या आणि आपल्या अभिनयाने अनेक पिढ्यांना प्रभावित करणाऱ्या… ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! नटसम्राट हरपला… असा नट पुन्हा होणे नाही!
