Girish Vyas lashes out at the BJP’s style of functioning : ज्या पक्षाच्या बांधणीसाठी आम्ही आमची तरुणाई खर्ची घातली, घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत पक्षासाठी काम केलं, त्याच पक्षात मोठे निर्णय घेताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात का घेतलं जात नाही? असा सवाल भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास यांनी उपस्थित केला आहे. पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
गिरीश व्यास यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला असून, भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नागपूर भाजपमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. व्यास यांनी आपलं कार्यालयही सोले यांच्या निवडणूक प्रचारासाठी उपलब्ध करून दिलं आहे. बडकस चौकातील या कार्यालयाचा शुभारंभ झाला असून, हे कार्यालय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाजवळ असल्याने राजकीय वर्तुळात या घडामोडीची चर्चा सुरू आहे.
भाजपच्या अंतर्गत संविधानानुसार उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होऊन इच्छुक उमेदवारांच्या नावांवर चर्चा व्हायला हवी, असं व्यास यांनी म्हटलं आहे. मात्र, पदवीधर मतदारसंघात ही प्रक्रिया का पाळली गेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर करताना पक्षातील प्रमुख आणि जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
सीजेपीच्या आंदोलनाआधीच राजधानी दिल्लीत हाय अलर्ट, ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् सीमांवर बीएसएफचा वेढा
पक्षात सुधाकर कोहळे एक कार्यकर्ते असतील, तर आम्हीही कार्यकर्तेच आहोत. मग निर्णय घेताना आम्हाला का विचारलं जात नाही? असा प्रश्न व्यास यांनी उपस्थित केला. पक्षाने ठरवलेल्या प्रक्रियेनुसारच निर्णय व्हावेत आणि पुढील पिढीतील कार्यकर्त्यांचं नुकसान होऊ नये, हीच जुन्या कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याचं थेट म्हणणार नाही, मात्र पक्षात काही जणांना अपेक्षेपेक्षा जास्त महत्त्व दिलं जात असल्याची टीका व्यास यांनी केली.
पक्षात अनेक जण कानामागून आले आणि तिखट झाले, अशी स्थिती आहे. आम्हाला त्यांच्यासारखी भपकेबाजी करता आली नाही. जर पक्षाला अशी भपकेबाजीच मान्य असेल, तर आम्हालाही निर्णय घ्यावाच लागेल, असं म्हणत त्यांनी आपल्या राजीनाम्यामागची भूमिका स्पष्ट केली. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना पदाधिकारी केलं जात असेल, तर वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं काय, असा सवालही व्यास यांनी उपस्थित केला.
अशा कार्यकर्त्यांची क्षमता संपली आहे का आणि त्यांना डावलून पदं दिली जाणाऱ्यांमध्ये नेमकी कोणती विशेष क्षमता आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. गिरीश व्यास यांच्या राजीनाम्यामुळे नागपूर भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. अनिल सोले यांना त्यांनी दिलेला पाठिंबा आणि पक्षाच्या उमेदवारी प्रक्रियेवर केलेली टीका यामुळे पदवीधर मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.
