Gold Adulteration Rhenium Powder: आता येत्या लग्नसराईच्या काळात तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण सोन्याच्या बाजारात भेसळीचा एक नवा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोन्याचे वजन वाढवण्यासाठी त्यात ‘रेनियम पावडर’ नावाच्या जड धातूची भुकटी मिसळली जात असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, ही भेसळ सामान्य तपासणीत सहज पकडली जात नाही. त्यामुळे ग्राहकांना 22 कॅरेट सोन्याचे पैसे देऊन प्रत्यक्षात 20 कॅरेटच्या आसपास शुद्धता असलेले सोने मिळण्याची शक्यता आहे.
आता गेम खेळायचाच; GTA 6 साठी पठ्ठ्याचं पत्नी अन् मुलीसोबत ‘नो-डिस्टर्बन्स’ एग्रीमेंट
नेमकी कशी केली जाते सोन्यात भेसळ?
‘दैनिक भास्कर’च्या एका रिपोर्टमधून सोन्यात रेनियम पावडर मिसळण्याचा हा प्रकार समोर आला आहे. रेनियम हा दुर्मिळ आणि वजनाने जड असलेला धातू आहे. सोन्यात ही पावडर मिसळल्याने दागिन्यांचे वजन वाढते. मात्र, वरवर पाहता सोन्याच्या शुद्धतेत फारसा फरक जाणवत नाही.
रिपोर्टनुसार, या पावडरचा पुरवठा चीनमधून होत असल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान चीनमधील शेन्झेन शहरातील एका एजंटशी संपर्क साधण्यात आला. त्याने भारतातील अनेक शहरांमध्ये या पावडरचे विक्रेते असल्याचा दावा केला.
तपासकर्त्यांनी मुंबईतील एका विक्रेत्याकडून या पावडरचा 1 ग्रॅम नमुना मिळवला. त्यानंतर राजस्थानमधील जोधपूर येथे एका सुवर्णकाराच्या मदतीने त्याची चाचणी करण्यात आली.
24 कॅरेट सोन्यात पावडर मिसळली अन्…
या प्रयोगात 7.83 ग्रॅम 24 कॅरेट सोन्यात 1 ग्रॅम रेनियम पावडर मिसळण्यात आली. त्यामुळे मिश्रणाचे एकूण वजन 8.83 ग्रॅम झाले. विशेष म्हणजे, तपासणीमध्ये हे मिश्रण 24 कॅरेट सोने असल्याचे दिसून आले.
यानंतर या मिश्रणात आणखी एक धातू मिसळून त्यापासून 22 कॅरेटचे दागिने तयार करण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष तपासणीत या दागिन्यांमध्ये केवळ 81.73 टक्के सोने असल्याचे आढळले. म्हणजेच त्यांची शुद्धता साधारण 20 कॅरेटच्या आसपास होती.
नियमानुसार, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.6 टक्के शुद्ध सोने असणे आवश्यक आहे. म्हणजेच ग्राहक 22 कॅरेट सोन्याचे पैसे देत असला, तरी त्याच्या हातात कमी शुद्धतेचे सोने पडू शकते. धक्कादायक बाब म्हणजे, अशा प्रकारे तयार केलेले दागिने काही शोरूम आणि टेस्टिंग सेंटरमधील तपासणीतही पास झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
रेनियमसोबत इतर धातूंचीही भेसळ
सोन्यात भेसळ करण्यासाठी केवळ रेनियमचाच वापर होत नाही. 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘मिंट’च्या अहवालानुसार, इंदूरच्या सराफा बाजारातील व्यापारी आणि कारागिरांनी सोन्यात रुथेनियम, इरिडियम आणि ऑस्मियम यांसारख्या जड धातूंची भुकटी मिसळली जात असल्याची चिंता व्यक्त केली आहे.
बाळासाहेबांचा फोटो फाडला, ठाकरे गट संतापला; मुंबईत आंदोलन, शायना एन. सी. यांनी मागितली माफी!
या धातूंचे वजन सोन्याइतके किंवा त्याहूनही जास्त असते. त्यामुळे सोन्याचे वजन वाढवण्यासाठी त्यांचा वापर केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
सोन्याची भेसळ ओळखणे कठीण का?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी अनेकदा ॲसिड टेस्ट, कसोटी दगड आणि कॅरेट तपासणी यंत्रांचा वापर केला जातो. मात्र, रेनियमसारख्या जड धातूंची भेसळ असल्यास या पारंपरिक पद्धतींमधून ती सहज लक्षात येत नाही.
त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करताना केवळ दुकानातील तपासणीवर अवलंबून न राहता हॉलमार्क, HUID क्रमांक आणि विश्वासार्ह तपासणी केंद्राकडून शुद्धतेची खात्री करणे महत्त्वाचे ठरते.
