आता गेम खेळायचाच; GTA 6 साठी पठ्ठ्याचं पत्नी अन् मुलीसोबत ‘नो-डिस्टर्बन्स’ एग्रीमेंट

GTA 6 Game GTA 6 चं वेड! गेम खेळण्यासाठी पत्नीलाच दिले पैसे; मुलीचीही घेतली परवानगी, तर शिक्षकाने चक्क परीक्षा पुढे ढकलली...

  • Ninad K
  • Written By: Published:
GTA 6

Husband Sign No Disturbance Agreement For GTA 6 Game : कल्पना करा… तुम्हाला तुमचा आवडता गेम खेळायचा आहे. तेही सलग सात दिवस पण घरात पत्नी आहे, मुलगी आहे, घरकाम आहे आणि रोजच्या जबाबदाऱ्याही आहेत. आता अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? सुट्टी घेऊन गेम खेळाल? घरच्यांना समजावाल? की थेट घरच्यांसोबत एक करारच करून टाकाल? एका पठ्ठ्यानं चक्का GTA 6 साठी चक्क पत्नी आणि मुलीसोबत ‘नो-डिस्टर्बन्स’ एग्रीमेंट केलयं आणि विशेष म्हणजे, या करारावर सही करण्यासाठी त्याने पत्नी आणि मुलीलाही चक्क पैसे दिलेत..नेमका हा सगळा प्रकार काय आहे? कुठे घडलाय? त्याबद्दल जाणून घेऊया…

जगभरातील गेमर्स ज्या गेमची गेल्या 13 वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या GTA 6 चं… याच गेमसाठी स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या 38 वर्षीय शॉन लिटिल यांना GTA 6 खेळण्याचं इतकं वेड आहे की, त्यांनी गेम खेळण्यासाठी आपली संपूर्ण आठवड्याची सुट्टी राखून ठेवली आहे. पण गेम खेळताना घरातून कोणतीही अडचण नको, यासाठी त्यांनी एक भन्नाट आयडिया शोधून काढली.

शॉन यांनी ‘GTA 6 Household Non-Interference Agreement’ म्हणजेच घरच्यांनी गेमिंगमध्ये अजिबात हस्तक्षेप करू नये, असा लेखी करार तयार केला आणि या करारावर पत्नी नताली आणि 13 वर्षांच्या मुलगी चार्लोट यांच्याकडून चक्क सह्याही करून घेतल्या….या करारानुसार पुढचे सात दिवस शॉन यांना घरातील कोणतीही जबाबदारी पार पाडावी लागणार नाही. एवढंच नाही, तर ‘किती वेळ गेम खेळणार?’, ‘अजून गेमच खेळतोयस का?’ असे टोमणे मारण्यावरही बंदी असेल…

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, पत्नी आणि मुलगी या सगळ्याला तयार तरी कशा झाल्या? तर शॉन यांनी यासाठी चांगलाच खिसा रिकामा केला आहे. करारावर सही करण्यासाठी त्याने पत्नीला 50 युरो, म्हणजे जवळपास 5 हजार रुपये, तर मुलीला 20 युरो म्हणजे जवळपास 2 हजार रुपये दिले आहेत.

एवढंच नाही, तर घराच्या आठवड्याच्या खर्चासाठी त्यांनी तब्बल 500 युरो म्हणजे जवळपास 51 हजार रुपये वेगळे ठेवले आहेत. एवढेचं नाही तर, घरात जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून आधीच खाण्यापिण्याच्या वस्तूंचा साठा करण्यात आलाय आणि भांडी घासण्याचा प्रश्नच येऊ नये म्हणून पठ्ठ्याने पेपर प्लेट्सही विकत आणल्या आहेत…म्हणजे गेमिंगसाठीची तयारी अगदी युद्धपातळीवर सुरू आहे…

शॉन यांचं हे वेड अचानक निर्माण झालेलं नाही. 2013 मध्ये GTA 5 रिलीज झाला, तेव्हा शॉन 25 वर्षांचे होते. तेव्हापासून ते GTA 6 ची वाट पाहत आहेत. म्हणजे तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा….या खास सुट्टीसाठी त्यांनी वीकेंडलाही काम केलं आणि तब्बल 13-13 तासांच्या शिफ्ट करून पैसेही जमा केले. सुरुवातीला हा करार त्यांनी केवळ टिकटॉक व्हिडिओसाठी गंमत म्हणून तयार केला होता. पण आता मात्र ते आपल्या गेमिंग प्लॅनबाबत पूर्णपणे गंभीर आहेत.

आता तुम्हाला वाटेल की गेमचं वेड फक्त शॉन यांच्यापुरतं मर्यादित आहे. तर थांबा… कारण GTA 6 च्या क्रेझचा आणखी एक भन्नाट किस्सा स्पेनमधून समोर आला आहे. इथल्या जुआन मिगुएल लोपेज नावाच्या एका कॉलेज शिक्षकाने तर, आपल्या विद्यार्थ्यांसाठी चक्क परीक्षेची तारीखच बदलली आहे… सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ईमेलनुसार, गेम लॉन्च होणाऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांना कोणताही गृहपाठ किंवा असाइनमेंट दिली जाणार नाही. एवढंच नाही, तर 23 तारखेला होणारी परीक्षा थेट 30 तारखेला पुढे ढकलण्यात आली आहे.  आता शिक्षकाने असं का केलं, याचं कारणही तितकंच भन्नाट आहे.

जुआन यांचं म्हणणं आहे की, 2013 मध्ये GTA 5 रिलीज झाला, तेव्हा ते स्वतःही त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वयाचे होते. त्यावेळी गेमबद्दल असलेली उत्सुकता आणि आनंद त्यांनी स्वतः अनुभवला होता. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनाही हा अनुभव घेता यावा, असं त्यांना वाटतं. मात्र, गेम खेळताना जबाबदारी विसरू नका आणि सुट्टीनंतर पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

एकीकडे गेम खेळण्यासाठी पत्नी आणि मुलीला पैसे देणारा नवरा, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी परीक्षाच पुढे ढकलणारा शिक्षक… GTA 6 ची क्रेझ नेमकी किती मोठी आहे, याचा अंदाज या दोन घटनांवरून येतो. पण आता खरा प्रश्न असा आहे की, जर, तुम्हाला सलग सात दिवस GTA 6 खेळण्याची संधी मिळाली, तर तुम्ही घरच्यांना किती पैसे द्यायला तयार व्हाल? की घरचेच तुम्हाला घराबाहेर काढतील? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा…

follow us