Harshwardhan Sapkal Congress : राज्याच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षात मोठ्या नेत्यांचे प्रवेश होणार असल्याचा दावा करत राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले आहे. (Congress) काँग्रेसमध्ये येण्यासाठी अनेक नेते इच्छुक असून मोठी वेटिंग लिस्ट तयार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, कोणाला पक्षात प्रवेश द्यायचा, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि प्रदेश नेतृत्व घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपला लक्ष्य केले. देशात 50 टक्के आरक्षणाची तरतूद काँग्रेसने आणल्याचे सांगत महिला आरक्षण विधेयक 2029 पासून लागू करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, आरक्षणाच्या नावाखाली भाजपकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या विधेयकाला इंडिया आघाडीतील सर्व पक्ष विरोध करतील, असा विश्वासही सपकाळ यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत जाण्याची शक्यता आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही सपकाळ यांनी भाष्य केले. भाजपला पाठिंबा देण्यापूर्वी मित्रपक्षांनी विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला. सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच भाजपसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष वेधले. दुसरीकडे, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यास स्वागत करू, असे विधान केल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.
आगामी 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या हालचालींनाही वेग येण्याची शक्यता आहे. याच संदर्भात बोलताना काँग्रेसमध्ये मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचा पुनरुच्चार सपकाळ यांनी केला. अनेक नेत्यांची पक्षात येण्यासाठी प्रतीक्षा यादी असून कोणाला प्रवेश द्यायचा, हे आम्ही ठरवू, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सपकाळ यांच्या या दाव्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे ते मोठे नेते नेमके कोण, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
