संजय राऊतांची दोन शब्दांत प्रतिक्रिया; शायना एनसींच्या कृतीवर संताप व्यक्त करत म्हणाले…
Sanjay Raut Reaction on Shaina NC : शायना एनसी यांनी पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या घटनेवरून राजकीय वाद पेटला आहे.
Sanjay Raut Reaction on Shaina NC : बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या (Thackeray) प्रकारावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्यांकडून सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाचा निषेध करत त्याची पाने फाडण्यात आली. याचवेळी शायना एनसी यांच्या हातून चुकून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला. या घटनेनंतर ठाकरे गटासह काँग्रेसनेही शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी अवघ्या दोन शब्दांत प्रतिक्रिया देत शिंदे गटावर निशाणा साधला.
काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी या घटनेवर समाजमाध्यमातून संताप व्यक्त केला. शिंदे गटाच्या नेत्यांनी बाळासाहेबांचा फोटो अनावधानाने नव्हे, तर जाणीवपूर्वक फाडल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका करत बाळासाहेबांच्या खांद्यावर चढून महाराष्ट्रात सत्ता मिळवली आणि नंतर त्यांचीच शिवसेना फोडण्याचे षडयंत्र रचले, असा दावा लोंढे यांनी केला. त्यांच्या या पोस्टला संजय राऊत यांनी पुनर्प्रसारित करत ‘बकवास लेकाचे’ अशा दोन शब्दांत शिंदे गटावर टीका केली.
या घटनेचे पडसाद मुंबई महापालिकेच्या सभागृहातही उमटले. ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी करत या प्रकाराचा निषेध केला. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही शिंदे गटाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडण्याच्या कृतीवर आक्षेप घेतला. ज्या बाळासाहेबांमुळे अनेकांना राजकीय ओळख मिळाली, त्यांचाच फोटो फाडला जाणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, शायना एनसी यांच्या कृतीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर शायना एनसी काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, फोटो फाडण्याच्या घटनेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.