High Court’s significant decision in the Kopardi case : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित कोपर्डी अत्याचार आणि हत्या प्रकरणात दोषींना सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेच्या पुष्टीकरणाबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशीष चव्हाण यांच्या खंडपीठाने 2 ऑक्टोबर 2026 रोजी कोपर्डी येथील घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. घटनास्थळाची भौगोलिक रचना, परिसरातील रस्ते, साक्षीदार नेमके कोणत्या ठिकाणी होते, त्या ठिकाणांवरून घटनास्थळ कितपत दिसू शकत होते तसेच आरोपींच्या कथित हालचाली प्रत्यक्ष पाहणे शक्य होते का, याचा खंडपीठाकडून अभ्यास केला जाणार आहे.
कोपर्डी प्रकरणातील दोषींनी त्यांच्या शिक्षेविरोधात दाखल केलेल्या अपीलांवर तसेच मृत्युदंडाच्या शिक्षेच्या पुष्टीकरणासाठी राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान साक्षीदारांच्या जबाबातील काही महत्त्वाच्या बाबी न्यायालयासमोर आल्या आहेत. प्रकरणातील काही साक्षीदारांनी आरोपींच्या हालचाली पाहिल्याचे न्यायालयासमोर सांगितले आहे. मात्र, संबंधित साक्षीदार ज्या ठिकाणी उपस्थित होते, तेथून घटनास्थळ आणि परिसरातील रस्ता प्रत्यक्ष कितपत दिसत होता आणि आरोपींच्या हालचाली स्पष्टपणे पाहणे शक्य होते का, हा महत्त्वाचा मुद्दा सुनावणीदरम्यान उपस्थित झाला आहे.
मनोज जरांगेंच्या कोअर कमिटीतील सदस्य अडचणीत, कोट्यवधींचा वाळू दंड वसूल करण्याचे आदेश
याच पार्श्वभूमीवर अंतिम युक्तिवादापूर्वी घटनास्थळ आणि परिसराची प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे न्यायमूर्ती स्वतः कोपर्डी येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. या पाहणीदरम्यान साक्षीदारांच्या जबाबांमध्ये नमूद करण्यात आलेली ठिकाणे, त्यांच्यातील अंतर, रस्त्याची दृश्यता आणि परिसराची प्रत्यक्ष रचना यांचा अभ्यास केला जाणार आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोपर्डी प्रकरणाच्या सुनावणीला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांची पडताळणी करण्यासाठी न्यायालयाला परिसराची वस्तुस्थिती समजण्यास मदत होणार आहे. विशेषतः साक्षीदारांच्या ठिकाणावरून संबंधित रस्ता आणि आरोपींच्या कथित हालचाली दिसणे शक्य होते का, याकडे न्यायालयाचे लक्ष असणार आहे. या पाहणीनंतर खंडपीठासमोर दोषींच्या अपीलांवर पुढील युक्तिवाद होणार आहे. त्याचबरोबर मृत्युदंडाच्या शिक्षेच्या पुष्टीकरणाच्या कार्यवाहीतही घटनास्थळाच्या पाहणीतील निरीक्षणे महत्त्वाची ठरू शकतात. त्यामुळे 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या प्रत्यक्ष पाहणीकडे या प्रकरणाशी संबंधित सर्वांचे लक्ष लागले आहे.
