Historic meeting between Modi and Jinping : दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी भारत-चीन संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाची कूटनीतिक घडामोड घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली. तब्बल सात वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आलेल्या जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या या चर्चेकडे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
या बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून सीमावादासह विविध मुद्द्यांमुळे तणावपूर्ण राहिलेल्या भारत-चीन संबंधांना अधिक स्थिर आणि व्यावहारिक पातळीवर पुढे नेण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी सात महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती झाल्याचे सांगण्यात आले.
सात मुद्द्यांवर सहमती
भारत आणि चीन परस्पर संबंधांकडे रणनीतिक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहणार आहेत. दोन्ही देशांतील मतभेदांचे रूपांतर वाद किंवा संघर्षात होऊ नये, यासाठी संवाद कायम ठेवण्यावर भर देण्यात आला. विशेषतः सीमा प्रश्नावर निष्पक्ष, न्याय्य आणि दोन्ही देशांना मान्य होईल असा तोडगा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे ठरले.
मनोज जरांगे पाटलांची मुंबईला जाण्याची घोषणा; आमदार रोहित पवारांचा सरकारला महत्वाचा सल्ला
आर्थिक आणि व्यापारी संबंधांना चालना देण्याबरोबरच सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. भारत आणि चीनमधील नागरिकांचा परस्पर संपर्क वाढवणे, व्यापारातील असमतोलासह आर्थिक चिंतांवर चर्चा करणे आणि त्यावर व्यावहारिक मार्ग शोधणे यालाही प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय प्रादेशिक तसेच जागतिक पातळीवरील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत आणि चीनने परस्पर सहकार्य वाढवण्याची तयारी दर्शवली.
सीमेवरील शांततेवर भारताचा भर
बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी वास्तविक नियंत्रण रेषेवरील शांतता आणि स्थैर्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारत-चीन संबंध दीर्घकालीन आणि सकारात्मक पद्धतीने पुढे न्यायचे असतील, तर सीमाभागात शांतता कायम राहणे आवश्यक असल्याची भारताची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सीमेवरील परिस्थिती स्थिर राहिल्यासच द्विपक्षीय संबंधांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होऊ शकते आणि व्यापार, गुंतवणूक तसेच इतर क्षेत्रांतील सहकार्याला अधिक गती देता येईल, असा भारताचा दृष्टिकोन या चर्चेत मांडण्यात आला.
दहशतवादाच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
ब्रिक्स परिषदेच्या जाहीरनाम्यात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. दहशतवादाच्या सर्व स्वरूपांविरोधात कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता अधोरेखित करताना ‘झिरो टॉलरन्स’चा संदेश देण्यात आला. दहशतवादी कारवायांसाठी होणारा आर्थिक पुरवठा रोखणे तसेच संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या दहशतवादी संघटना आणि संबंधित घटकांविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या भूमिकेलाही महत्त्व देण्यात आले. या मुद्द्यांवर चीनने दर्शवलेल्या सहमतीकडेही विशेष लक्ष वेधले जात आहे.
“बापासारखं शरीर कुठून आणणार?”;श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली
सीमा आणि व्यापार तूट ही मोठी आव्हाने
मोदी-जिनपिंग भेटीत सकारात्मक वातावरण दिसून आले असले तरी भारत-चीन संबंधांसमोरील प्रमुख प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेले नाहीत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सीमावाद. वास्तविक नियंत्रण रेषेवर दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे हे दोन्ही देशांसमोरील मोठे आव्हान कायम आहे. त्याचबरोबर भारताचा चीनसोबत असलेला मोठा व्यापार तुटवडा हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. भारत चीनकडून मोठ्या प्रमाणावर वस्तू आयात करतो; मात्र त्या तुलनेत भारतीय उत्पादनांना चिनी बाजारपेठेत अपेक्षित संधी मिळत नसल्याची भारताची दीर्घकाळापासूनची चिंता आहे. त्यामुळे व्यापार अधिक संतुलित करण्यासाठी बाजारपेठेतील अडथळे दूर करण्यावर आगामी चर्चांमध्ये भर राहण्याची शक्यता आहे.
भारत-चीन संबंधांचे नवे पर्व?
सात वर्षांनंतर भारतात झालेली मोदी-जिनपिंग यांची ही महत्त्वपूर्ण भेट दोन्ही आशियाई महासत्तांच्या संबंधांच्या दृष्टीने विशेष मानली जात आहे. सीमावाद आणि व्यापारी मतभेद कायम असतानाही संवाद, आर्थिक सहकार्य आणि परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये पुढे जाण्याची तयारी या बैठकीत दिसून आली. मुळे भारत-चीन संबंध आता जुन्या ‘हिंदी-चिनी भाई-भाई’च्या भावनिक चौकटीऐवजी व्यावहारिक भागीदारी, आर्थिक सहकार्य, परस्पर हितसंबंध आणि नियंत्रित स्पर्धा या नव्या चौकटीत पुढे जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
