Kajia Liz Mejo Miss Universe 2026 : मिस युनिव्हर्स 2026 स्पर्धेची अंतिम फेरी जवळ येत असताना भारताची प्रतिनिधी काजिया लिज मेजो हिने आपल्या दमदार सादरीकरणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतले आहे. प्यूर्टो रिको येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत जगभरातील 115 स्पर्धकांशी तिची टक्कर आहे. आत्मविश्वास, सौंदर्य आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर काजिया स्पर्धेत आपली छाप पाडत असून भारतीय चाहत्यांकडून तिला मोठा पाठिंबा मिळत आहे.
स्पर्धेच्या प्रिलिमिनरी फेरीत काजियाने नॅशनल कॉस्च्युम, स्विमसूट आणि इव्हनिंग गाऊन अशा तिन्ही प्रकारांत सहभाग घेतला. प्रत्येक फेरीत तिचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. विशेषतः इव्हनिंग गाऊन राऊंडमधील तिच्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सोनेरी रंगाच्या आकर्षक गाऊनमध्ये तिने रॅम्पवर एंट्री करताच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
व्हिएतनामच्या डिझायनर Nhà Mốt यांनी काजियासाठी हा खास गाऊन तयार केला होता. मरमेड सिल्हूट असलेल्या या पोशाखाच्या खालच्या भागात सोनेरी रंगातून निळ्या रंगाकडे जाणारा ओम्ब्रे इफेक्ट देण्यात आला होता. सोनेरी धाग्यांनी केलेली बारीक नक्षी, बीड्सचे काम आणि खांद्यापासून पुढे पसरलेला स्कल्प्चरल नेकपीस यामुळे तिच्या लूकला राजेशाही स्वरूप प्राप्त झाले होते.
या गाऊनमागील संकल्पना स्पष्ट करताना काजियाने सोशल मीडियावर सांगितले की, भारताची वीरता आणि ‘सोने की चिडिया’ ही ओळख यातून प्रेरणा घेण्यात आली आहे. देशाची ताकद, सौंदर्य आणि धैर्य दाखवण्याचा प्रयत्न या पोशाखातून करण्यात आला आहे. गाऊनमधील निळ्या रंगाच्या वापरातून भारतीय वारसा आणि केरळच्या संस्कृतीला विशेष सन्मान देण्यात आल्याचेही तिने नमूद केले.
Pooja Birari : शिवानी चुकीच्या गोष्टी खपवून घेत नाही, जे पटत नाही ते स्पष्टपणे बोलते
स्विमसूट राऊंडमध्येही काजियाने आपल्या आत्मविश्वासपूर्ण वॉकने उपस्थितांचे लक्ष वेधले. इलेक्ट्रिक ब्लू रंगाच्या टू-पीस पोशाखात तिने दमदार अंदाजात रॅम्प वॉक केला. तिच्या या सादरीकरणाला ‘हिप्नोटिका’ असे नाव देण्यात आले होते. स्टाइल, देहबोली आणि उत्साही वॉक यांचा सुरेख मेळ साधत तिने या फेरीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली.
काजियाचा रनवे कोच अर्निश इम्पिशा डाइमरी यांनीही तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. अंतिम क्षणी काही बदल करावे लागले आणि मोठ्या व्यासपीठावर सादरीकरणाचे आव्हान होते, तरीही काजियाने प्रत्येक संधीचा उत्तम उपयोग केल्याचे त्यांनी म्हटले. तिच्या या सादरीकरणाला सोशल मीडियावरही चांगला प्रतिसाद मिळत असून भारतीय चाहत्यांकडून तिच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
नॅशनल कॉस्च्युम राऊंडमध्ये काजियाने केरळची रंगीबेरंगी संस्कृती आणि समृद्ध परंपरा दर्शवणारा खास पोशाख परिधान केला होता. ‘हाऊस ऑफ सिद्धांत’ यांनी हा कॉस्च्युम डिझाइन केला असून त्यात भारतातील विविध भागांमधील कापडांचा वापर करण्यात आला. प्यूर्टो रिकोच्या आकर्षक रंगांचीही त्यात सांगड घालण्यात आली होती. भारत आणि यजमान देशाच्या संस्कृतीतील नाते दाखवण्याचा या पोशाखामागे उद्देश होता.
विशेष म्हणजे हा संपूर्ण कॉस्च्युम अवघ्या 5 दिवसांत तयार करण्यात आला. यासाठी 16 जणांच्या टीमने काम केले असून एकूण 80 मॅन-डेज इतकी मेहनत घेण्यात आली. सामान्यतः अशा संकल्पनेवर आधारित पोशाख तयार करण्यासाठी अनेक आठवडे लागतात. मात्र, कमी वेळेतही डिझायनर टीमने हा पोशाख साकारला. आता मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकण्यासाठी काजियासमोर जगभरातील 115 स्पर्धकांचे आव्हान आहे. तिच्या आतापर्यंतच्या कामगिरीनंतर भारतीय चाहत्यांच्या नजरा अंतिम फेरीकडे लागल्या आहेत.
