Jarange levels serious allegations against Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून, त्यांच्यासोबत मराठा आंदोलक देखील मुंबईकडे कूच करणार आहेत. हा प्रवास पाच दिवसांचा असणार असून त्यानंतर जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणार आहेत, मात्र मुंबईतील आंदोलनापूर्वीच आपले आंदोलन बंद पाडण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना ईडीच्या नोटिसा पाठवल्या जात असून, यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस मध्ये पडत नाहीत, मात्र आता त्यांच्या भूमिकेबाबत संशय येत आहे. माझ्या आजूबाजूच्या आणि जवळच्या लोकांना ईडीच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. ईडीला देशात एक दर्जा आहे. मात्र अंतरवाली सराटीसारख्या गावातील लोकांना नोटिसा पाठवल्या तर ईडीची इज्जत काय राहणार? देशांतील मोठ्या लोकांना सोडून ईडी अंतरवालीत येत आहे. माझ्यासोबत काम करतात म्हणून लोकांना त्रास द्यायचा आणि त्यांनी आंदोलनात काम करू नये म्हणून ईडीच्या नोटीसा पाठवायच्या, असा प्रकार सुरू आहे. एक-दोन लोकांना नोटीस आली असती तर वेगळी गोष्ट होती, मात्र अनेकांना नोटीस पाठवल्या जात असल्याने आंदोलन बंद पडण्याचा हा डाव असल्याचा संशय आहे.
‘आता ही शेवटची लढाई, मेलो तरी मागं हटणार नाही’; जरांगेंचा सरकारला इशारा!
मला साथ देणाऱ्यांना गार करण्यासाठी आणि आंदोलनापासून दूर करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. मात्र, अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्याशी पाठीशी उभे राहिले पाहिजे. आमच्याकडे पूर्ण हिशोब आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्राने अनेक नेत्यांवर झालेल्या कारवाया पाहिल्या आहेत. आता आमचे लोक देखील संबंधितांविरोधात ईडीकडे अर्ज करतील. ईडीने फक्त अंतरवालीतील लोकांचीच चौकशी का करावी? इतरांची देखील चौकशी झाली पाहिले. आंदोलनापासून लोकांनी लांब जावे यासाठी फडणवीसांनी षडयंत्र रचले आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळच्या आणि संबंधित लोकांच्या व्यवहारांबाबतही ईडीकडे तक्रारी करण्यात येतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. त्यांचे पाहुणे कंत्राटदार असतील, कुठे नोकरी करत असतील, इमारती किंवा दवाखाने असतील, तर त्याबाबतही माहिती घेतली जाईल आणि अर्ज केले जातील. फक्त अंतरवालीतील लोकांनाच त्रास सहन करावा लागणार नाही, असेही त्यांनी म्हटले. तसेच केवळ अंतरवालीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील अवैध दारूच्या मुद्द्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि सर्व गावांमध्ये झालेल्या विकासकामांच्या फाईल्सचीही तपासणी केली पाहिजे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
