…तर दहा मिनिटांच्या आत अख्खा महाराष्ट्र बंद पडला पाहिजे, जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा

12 सप्टेंबरच्या बैठकीसाठी हातातली कामं बाजूला ठेवून मराठ्यांनी आंतरवली सराटीत बैठकीसाठी यावं, असं जरांगे म्हणाले आहेत.

Untitled Design   2026 09 07T125725.898

Untitled Design 2026 09 07T125725.898

Jarange Patil’s final warning : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 12 सप्टेंबरला आंतरवली सराटीत महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीसाठी राज्यभरातील मराठा समाजाने उपस्थित राहावं, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. हातातली कामं बाजूला ठेवून मराठ्यांनी आंतरवली सराटीत बैठकीसाठी यावं, असं जरांगे म्हणाले आहेत. 12 सप्टेंबरच्या बैठकीसाठी येणाऱ्या मराठा बांधवांवर कुठेही हल्ला झाला आणि एकाच्याही शरीरातून रक्त निघालं, तर दहा मिनिटांच्या आत अख्खा महाराष्ट्र बंद पडला पाहिजे, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मात्र, पोलिसांनी कितीही त्रास दिला तरी मराठा आंदोलकांनी पोलिसांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही, असं आवाहनही त्यांनी केलं. मराठ्यांना संपवण्यासाठी सरकारच षडयंत्र करत असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला फसवत असल्याचा आरोप करत सरकारकडून जाणूनबुजून हलगर्जीपणा सुरू असल्याचंही जरांगे म्हणाले. सरकारला 12 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला असल्याचं सांगताना जरांगे यांनी उपमुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेखही केला.

तुकाराम मुंढेंना प्रिती झिंटाचा पाठिंबा? ‘टीम तुकाराम मुंढे’ लिहिलेला टी-शर्ट घालून दिसली अभिनेत्री, व्हिडीओ चर्चेत

दरम्यान, कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातील बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुणबी नोंदींबाबतचा उपलब्ध डेटा आजच वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये लावण्यात येणार असल्याचंही समजत आहे. कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी 10 सप्टेंबरपासून विशेष कॅम्प सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भातील प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, मनोज जरांगे यांनी 12 सप्टेंबरच्या आंतरवली सराटीतील बैठकीकडे लक्ष वेधलं आहे. या बैठकीत मराठा आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाणार असून, मुंबईला जाण्याची तारीखही याच बैठकीत ठरवण्यात येणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे 12 सप्टेंबरला आंतरवली सराटीत होणाऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागलं आहे.

Exit mobile version