दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा करा! जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

दिवाळीपूर्वी ही मदत तातडीने वितरित करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.

Untitled Design   2026 10 31T174744.995

Untitled Design 2026 10 31T174744.995

Jayant Patil makes a demand to the Chief Minister via a letter : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, रब्बी हंगामाची अनिश्चितता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे बळीराजासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असली, तरी अद्याप ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी ही मदत तातडीने वितरित करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.

यासंदर्भात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिले असून, त्याची माहिती सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये आणि सणासुदीच्या काळात त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी सरकारने तातडीने निर्णय घेण्याची आग्रही विनंती त्यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आगामी रब्बी हंगामाबाबतही शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत अद्याप प्रत्यक्ष खात्यावर जमा झालेली नाही. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय जाहीर केलेली मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी शरद पवार मैदानात; पुढील तीन दिवस चार जिल्ह्यांचा दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद!

केवळ आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे म्हणत जयंत पाटील यांनी सरसकट कर्जमाफीची मागणीही केली आहे. सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
शासनाने यापूर्वी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर केला असला, तरी त्याचा लाभ बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे कोणतीही दिरंगाई न करता राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले प्रोत्साहन अनुदानही अद्याप अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर प्रलंबित असलेले 10 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. यासोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली 50 हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कमही तातडीने वितरित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

एल निनोचा प्रभाव ओसरणार, आता ला निना सक्रिय होण्याची शक्यता, भारतावर काय परिणाम?

दुष्काळी मदत, सरसकट कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान या तीन प्रमुख मागण्यांकडे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. राज्यातील शेतकरी मोठ्या अपेक्षेने सरकारच्या निर्णयाकडे पाहत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागांना तातडीने आदेश द्यावेत आणि दिवाळीपूर्वी मदतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाची दिवाळी अंधारात जाऊ नये, त्याच्या कुटुंबाला सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा आणि सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, हीच अपेक्षा असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version