Madhya Pradesh Seoni Police Viral Video: मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हॉटेलमध्ये थांबलेल्या एका प्रेमी युगुलाची चौकशी करताना वरिष्ठ पोलीस अधिकारी तरुणाच्या बॅगेत गांजा ठेवून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याबाबत धमकी देत आहे. या प्रकरणात हॉटेल मालकाने पोलिसांवर दरमहा 25 हजार रुपयांची मागणी केल्याचाही आरोप केला आहे.
13 नोव्हेंबर 2026 रोजी ही घटना घडली. सिवनीतील सिद्धार्थ हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) दीपक मिश्रा, उपविभागीय पोलीस अधिकारी (SDOP) चंचलेश मरकाम आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश तिवारी हे एका तरुण-तरुणीची चौकशी करताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
चौकशीदरम्यान या दोघांनीही आपण सज्ञान असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच, आपण एकाच जातीचे असून एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, तरीही पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबीयांना बोलावण्याचा आग्रह धरला जात असल्याचे व्हिडीओत दिसते.
मोबाईल अनलॉक करण्यास नकार दिल्यानंतर गांजा ठेवण्याची धमकी?
तरुणीने आपला मोबाईल फोन अनलॉक करून कुटुंबीयांशी बोलण्यास नकार दिल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ASP दीपक मिश्रा हे सोबतच्या कर्मचाऱ्यांना तरुणाच्या बॅगेत गांजा ठेवण्याबाबत सांगत आहेत.
या कथित वक्तव्यामुळे पोलिसांच्या अधिकारांचा गैरवापर होत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. तरुण-तरुणीने पालकांना न सांगता एकत्र वेळ घालवण्याचा निर्णय का घेतला, यावरून अधिकारी त्यांना जाब विचारत असल्याचेही व्हिडीओत दिसते.
हॉटेल मालकाचा पोलिसांवर 25 हजार रुपये मागितल्याचा आरोप
या प्रकरणात हॉटेल मालक संजू सनोडिया यांनी स्थानिक पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, पोलिसांकडून दरमहा 25 हजार रुपयांची मागणी केली जात होती. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश तिवारी, SDOP चंचलेश मरकाम आणि वाहतूक निरीक्षक विजय बघेल यांनी ही रक्कम मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पैसे देण्यास नकार दिल्यानंतरच हॉटेलवर छापा टाकण्यात आल्याचा दावा सनोडिया यांनी केला. पोलिसांच्या कथित गैरप्रकारांचा पर्दाफाश करण्यासाठी आपणच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांची कठोर कारवाई; 6 पोलीस कर्मचारी निलंबित
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांच्या गणवेशातील बेशिस्त आणि गैरवर्तन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात प्रथमदर्शनी संशयास्पद वर्तन आढळल्याने ASP, SDOP यांच्यासह एकूण 6 पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सविस्तर चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
Sonia Gandhi Book : दोन लाख प्रती, 26 कोटींचं उत्पन्न; सोनियांना किती पैसे मिळणार?
पोलीस दलात शिस्त, जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठा महत्त्वाची आहे. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे अपेक्षित आहे. गैरवर्तन करणारे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिला आहे.
मध्य प्रदेश –
सिवनी जिला पुलिस एक होटल में पहुंची। वहां एक कपल मिला। लड़की ने कहा कि हम दोनों बालिग हैं, एक ही जाति से हैं। शादी करना चाहते हैं।पुलिस ने लड़की पर मोबाइल का लॉक खोलकर फैमिली को फोन मिलाने के लिए कहा।
लॉक नहीं खोला तो एडिशनल SP दीपक मिश्रा ने कहा– ”इस लड़के के पास गांजा रख दो”
— Sachin Gupta (@Sachingupta) November 17, 2026
