Maharashtra Rabi Sowing: राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका आता रब्बी हंगामालाही बसत असल्याचे चित्र आहे. यंदा रब्बी पेरणीचा वेग अत्यंत मंदावला असून, आतापर्यंत केवळ 14 लाख 74 हजार 304 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 1972-73 च्या दुष्काळी वर्षात 47.29 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. त्यामुळे यंदाची आकडेवारी पाहता 1972 च्या दुष्काळापेक्षाही आताची परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र समोर आले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत पेरण्या सुरू राहणार असल्या, तरी यंदा एकूण पेरणी क्षेत्र 20 ते 25 लाख हेक्टरपर्यंतच मर्यादित राहण्याचा अंदाज आहे.
खरचं कोणीतरी आठवण काढतं म्हणून उचकी लागते? की, यामागे आहे वेगळचं कारण…
एल निनोचा पावसावर परिणाम; खरीप हंगामालाही फटका
प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या एल निनोचा परिणाम यंदाच्या मोसमी पावसावर झाल्याचे हवामानविषयक संस्थांनी म्हटले आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत 19 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात तर सरासरीपेक्षा 59 टक्के कमी पाऊस झाला आहे. अपवाद वगळता बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट कायम राहिली. विशेष म्हणजे, यंदा जुलै महिन्यातील सुरुवातीच्या पंधरा दिवसांतच बहुतांश पाऊस झाल्याने खरीप हंगामालाही मोठा फटका बसला.
1972 च्या दुष्काळातील पेरणीपेक्षाही यंदाचे क्षेत्र कमी
कृषी विभागाकडे 1960 पासूनच्या रब्बी पेरणीची आकडेवारी उपलब्ध आहे. राज्यात रब्बी हंगामात सरासरी 55 ते 60 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. 1972-73 मध्ये दुष्काळ असतानाही 47.29 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यावेळी 36.64 लाख हेक्टरवर अन्नधान्य, 4.31 लाख हेक्टरवर कडधान्ये आणि 6.34 लाख हेक्टरवर तेलबियांची लागवड झाली होती.
यंदा मात्र आतापर्यंत 14.74 लाख हेक्टरवरच पेरणी झाली आहे. यामध्ये 7.79 लाख हेक्टरवर अन्नधान्य पिके, 6.78 लाख हेक्टरवर कडधान्ये, तर अवघ्या 16 हजार 106 हेक्टरवर तेलबियांची पेरणी झाली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत पेरण्या सुरू राहणार असल्या, तरी एकूण क्षेत्र 20 ते 25 लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जनावरांच्या चारा-पाण्याचे मोठे आव्हान
दुष्काळामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचीही चिंता निर्माण झाली आहे. सिंचनासाठी उपलब्ध असलेल्या पाण्यातून शेतकऱ्यांनी चारा पिके घ्यावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) म्हणाले की, राज्यातील शेतकरी भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहेत. एकवेळ नागरिकांना अन्नधान्य पुरवठा करणे शक्य आहे; मात्र जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करणे मोठे आव्हान ठरणार आहे. संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार आणि कृषी विभागाकडून नियोजन सुरू आहे.
यंदा रब्बी पेरणीचे क्षेत्र किती वाढते, याकडे आता शेतकरी आणि कृषी विभागाचे लक्ष लागले आहे. मात्र पाण्याची उपलब्धता आणि पावसाची तूट पाहता राज्यातील शेतीसमोरील संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.
