Major change to Blinkit’s ambulance service : क्विक कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ब्लिंकिंटने सुरू केलेल्या अॅम्ब्युलन्स सेवेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध होती. मात्र आता कंपनीने या सेवेसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोचे संस्थापक आणि ब्लिंकिंटचे प्रमुख दीपिंदर गोयल यांनी जाहीर केल्यानुसार, यापुढे नॉन इमर्जन्सी ऍम्ब्युलन्स सेवेसाठी 2 हजार 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, जीविताला धोका असलेल्या आपत्कालीन परिस्थितीत ऍम्ब्युलन्स सेवा पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे मोफत राहणार आहे.
दीपिंदर गोयल यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून या निर्णयाची माहिती दिली. गेल्या दोन वर्षांत ब्लिंकिंटच्या ऍम्ब्युलन्स सेवेमार्फत सुमारे 42 हजार प्रकरणांमध्ये मदत करण्यात आली असून, त्यापैकी जवळपास 20 हजार प्रकरणे आपत्कालीन स्वरूपाची होती. विशेष म्हणजे, या सेवेसाठी कंपनीने आतापर्यंत कोणतेही शुल्क आकारलेले नाही. भविष्यात देखील ही सेवा अधिक सक्षमपणे सुरू ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.
ऍम्ब्युलन्स सेवा मोफत असल्यामुळे अलीकडेच काळात रुटीन चेकअप, रुग्णालयात जाणे किंवा उपचारानंतर घरी परतणे अशा नियमित प्रवासासाठी देखील मोठया प्रमाणात बुकिंग होऊ लागले होते. मात्र, अशा बुकिंगमुळे पॅरामेडिक्स आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेली ऍम्ब्युलन्स आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे एखाद्या गंभीर रुग्णाला ऐनवेळी अॅम्ब्युलन्सची गरज असताना ती उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
FDA Action : 25 आस्थापनांचे परवाने रद्द तर 954 निलंबित, तुकाराम मुंढेंनी कारवाईचा पाढाच वाचून दाखवला!
नव्या नियमांनुसार, आपत्कालीन परिस्थितीतील अॅम्ब्युलन्स सेवा पूर्णपणे मोफत राहील. मात्र, नियमित किंवा नॉन-इमर्जन्सी रुग्णवाहिका सेवेसाठी आता २ हजार ५०० रुपये शुल्क आकारले जाईल. विशेष म्हणजे, हे शुल्क प्रवास पूर्ण झाल्यानंतरच आकारण्यात येणार आहे. खासगी अॅम्ब्युलन्स सेवांच्या तुलनेत हे शुल्क साधारण त्याच पातळीवर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या माध्यमातून जमा होणारा निधी अॅम्ब्युलन्स सेवा चालवणाऱ्या इटर्नल फाउंडेशनकडे जमा केला जाणार आहे. या निधीचा उपयोग सेवेचा विस्तार आणि अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ब्लिंकिटच्या या निर्णयामागे कोणताही नफा कमावण्याचा उद्देश नसून, गरजू रुग्णांना वेळेत अॅम्ब्युलन्स उपलब्ध व्हावी, हा मुख्य हेतू आहे. नॉन-इमर्जन्सी बुकिंगवर शुल्क आकारल्यामुळे अशा प्रवासांसाठी अॅम्ब्युलन्सचा वापर कमी होईल आणि गंभीर रुग्णांसाठी अधिक रुग्णवाहिका उपलब्ध राहतील, अशी कंपनीला अपेक्षा आहे. त्यामुळे ब्लिंकिटची दहा मिनिटांत अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची सेवा भविष्यातही अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यास मदत होणार आहे.
