‘राहुल गांधी, तुम्ही एक लाखांनी आलात तर आम्ही एक कोटींनी येऊ; आता लढाई रस्त्यावरच!’ फडणवीसांचा इशारा
Devendra Fadnavis on Rahul Gandhi; 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' या घोषणेखाली महायुतीने नागपुरात महापदयात्रेचं आयोजन केलं होतं.
Devendra Fadnavis on Rahul Gandhi: नागपूर : ‘राहुल गांधी, तुम्ही एक लाखांनी आलात, तर आम्ही एक कोटींनी येऊ. ही लढाई देशाच्या संविधानासाठी आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना थेट आव्हान दिलं आहे. ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या घोषणेखाली महायुतीने नागपुरात महापदयात्रेचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशाची व्यवस्था बदलण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. राहुल गांधी आणि त्यांचे कच्चेबच्चे ज्या पद्धतीने लोकशाही आणि संविधानाला डावलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याविरोधात ही लढाई आहे, असं फडणवीस म्हणाले. राहुल गांधी यांनी ‘अब लढाई संसद में नहीं, सड़क पर होगी’ असं विधान केलं होतं. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान आहे, तोपर्यंत लढाई संसदेतच होईल. पण राहुल गांधी, तुम्ही म्हणत असाल की आता लढाई संसदेत नाही, तर रस्त्यावर होईल, तर लक्षात ठेवा, तुम्ही एक लाखांनी आलात तर आम्ही एक कोटींनी येऊ. ही लढाई देशाच्या संविधानासाठी आहे.’
‘राहुल गांधींना देशात रेजीम चेंज करायचंय’
यावेळी फडणवीस यांनी राहुल गांधींच्या ‘रेजीम चेंज’च्या भूमिकेवरूनही टीका केली. राहुल गांधींच्या नेतृत्वात देशात एक षडयंत्र सुरू असून, त्यांना केवळ सत्ताबदल नको आहे, तर देशाची संपूर्ण व्यवस्था बदलायची आहे, असा आरोप त्यांनी केला. ‘रेजीम चेंज म्हणजे व्यवस्था परिवर्तन. लोकशाही, भारतीय संविधान आणि संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांमध्ये त्यांना परिवर्तन करायचं आहे. त्यांना डावी व्यवस्था आणायची आहे. या षडयंत्राचे प्रमुख राहुल गांधी आहेत’, असं फडणवीस म्हणाले.
‘काँग्रेस संविधान हातात घेऊन संविधानविरोधी काम करते’
काँग्रेसवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, हातात संविधान घेऊन संविधानविरोधी काम करण्याची भूमिका काँग्रेस सातत्याने घेत आली आहे. एसआयआर (SIR) प्रक्रियेत 3 कोटी मृत मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. मात्र, राहुल गांधी या नावांबाबतही प्रश्न उपस्थित करत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. ‘कदाचित राहुल गांधींना वाटत असेल की, जिवंत लोक आपल्याला मत देत नाहीत, निदान मेलेले तरी मत देतील’, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
दरम्यान, विरोधकांकडून लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्याचा आरोप केला जात असताना, महायुतीने ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या अभियानाच्या माध्यमातून नागपुरात शक्तिप्रदर्शन केलं. या कार्यक्रमातून फडणवीस यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत संविधानाच्या मुद्द्यावरून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.