माळेगाव कारखान्याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, उसाला 3,900 रुपये पहिली उचल जाहीर, सुनेत्रा पवारांचा महत्त्वपूर्ण निर्णय!

कारखान्याच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Untitled Design   2026 11 21T200310.084

Untitled Design 2026 11 21T200310.084

Major relief for farmers from Malegaon sugar factory : बारामती तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन 3 हजार 900 रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

सध्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना प्रतिटन 3 हजार 900 ते 4 हजार रुपयांपर्यंत पहिली उचल दिली जात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील माळेगाव कारखाना यंदा किती दर जाहीर करणार, याकडे शेतकरी आणि सभासदांचे विशेष लक्ष लागले होते. त्यातच बारामती स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी प्रतिटन 3 हजार 950 रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली होती. मंगळवारी 16 तारखेला करण्यात आलेल्या या मागणीमुळे ऊस दराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता.

या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ऊस दराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्याची बाजारपेठेतील परिस्थिती, इतर कारखान्यांनी जाहीर केलेले दर आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा विचारात घेऊन अखेर प्रतिटन 3 हजार 900 रुपये पहिली उचल देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष नितीन शेंडे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांच्यासह संचालक मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्रिपदाचा दबदबा चालला नाही! राजस्थानमध्ये झाबर सिंह खर्रा यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांचा पराभव

दरम्यान, माळेगाव कारखान्याच्या या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी स्वागत केले आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील रिकव्हरी झोनमधील कारखान्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातील माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्यांनीही चांगली पहिली उचल जाहीर केली आहे. त्यामुळे येथील ऊस उत्पादकांना अधिकचे पैसे मिळणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच या निर्णयाबद्दल माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यासाठी पुढील आठवड्यात आपण स्वतः बारामतीला येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनीदेखील कारखाना प्रशासनाचे अभिनंदन केले. माळेगाव कारखान्याने 3 हजार 900 रुपयांची पहिली उचल जाहीर करून लोकनेते अजितदादा पवार यांना ऊस दराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तर सभासद राहुल पाटील तावरे यांनीही सभासदांच्या वतीने या निर्णयाचे स्वागत केले.

बिटकॉइन मध्ये मोठी घसरण! दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर किंमत, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले

दुसरीकडे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात गाळपाच्या बाबतीतही चांगली कामगिरी केली आहे. अवघ्या 38 दिवसांत कारखान्याने 3 लाख 20 हजार टनांहून अधिक उसाचे गाळप पूर्ण केले आहे. या कालावधीत 3 लाख 32 हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले असून सरासरी साखर उतारा 10.76 टक्के इतका मिळाला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी ही माहिती दिली.

एकीकडे गाळपाचा वेग कायम ठेवताना दुसरीकडे शेतकऱ्यांना चांगला ऊस दर देण्याचा निर्णय माळेगाव कारखान्याने घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किती फायदा होतो आणि आगामी काळात इतर साखर कारखाने कोणता दर जाहीर करतात, याकडे आता संपूर्ण बारामती परिसरातील ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version