Major setback for Narottam Mishra from the BJP : मध्य प्रदेशच्या राजकारणात एकेकाळी भाजपचे सर्वात प्रभावशाली नेते मानले जाणारे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना दतिया विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 2020 मध्ये कमलनाथ यांच्या काँग्रेस सरकारला सत्तेबाहेर करण्याच्या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नरोत्तम मिश्रांनाच आता भाजपने बाजूला केल्याची चर्चा रंगली आहे. भाजपने दतिया मतदारसंघातून नरोत्तम मिश्रा यांच्याऐवजी आशुतोष तिवारी यांना उमेदवारी जाहीर केली.
गेल्या काही महिन्यांपासून मिश्रा दतियामध्ये सक्रिय होते. त्यांनी मतदारसंघात दौरे केले, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि उमेदवारी निश्चित असल्याच्या विश्वासातून उमेदवारी अर्जही विकत घेतला होता. त्यामुळे त्यांचे नाव जाहीर होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र अंतिम यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. तिकीट कापल्याची घोषणा होताच दतियामध्ये भाजपविरोधात संताप उसळला. जिल्हा, मंडळ आणि बूथ स्तरावरील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. समर्थकांनी महामार्ग रोखून आंदोलन केले. पोलिसांशी झालेल्या धक्काबुक्कीत आठ पोलिस कर्मचारी जखमी झाले, तर काही शासकीय वाहनांचे नुकसानही झाले.
या घडामोडीनंतर नरोत्तम मिश्रा यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. हा पक्षाचा निर्णय आहे. सोशल मीडियावर काही कार्यकर्ते संतापाच्या भरात अयोग्य कृत्य करताना दिसत आहेत. असे करू नका. आपली भूमिका पक्षाच्या व्यासपीठावर मांडावी, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनीही पक्षाचा निर्णय विचारपूर्वक घेतल्याचे सांगितले. नरोत्तम मिश्रा हे पक्षाचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांच्याशी चर्चा करून परिस्थिती सुरळीत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र उमेदवारीबाबतचा निर्णय बदलण्याचे कोणतेही संकेत त्यांनी दिले नाहीत.
भारतीय पर्यटकांची व्हिएतनाम सहल ठरली दुर्दैवी; 32 पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट समुद्रात उलटली, 15 जणांचा मृत्यू
राजकीय वर्तुळात मात्र या निर्णयामागील कारणांबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू आहेत. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, दतिया मतदारसंघात नरोत्तम मिश्रा यांच्याविरोधात स्थानिक पातळीवर नाराजी असल्याचा अहवाल पक्ष नेतृत्वाला मिळाला होता. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव, स्थानिक कार्यकर्त्यांमधील असंतोष आणि त्यांच्या कुटुंबाभोवती तयार झालेल्या राजकीय व्यवस्थेबाबतही पक्षामध्ये प्रश्न उपस्थित होत होते.
याशिवाय हा निर्णय केवळ स्थानिक समीकरणांचा नसून भाजपमधील अंतर्गत सत्तासंतुलनाशीही जोडला जात आहे. शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असताना नरोत्तम मिश्रा हे राज्यातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जात होते. सरकार आणि संघटनेतील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे दतियातून पुन्हा विजय मिळवून ते मंत्रिमंडळात परतले असते, तर राज्यात आणखी एक प्रभावी सत्ताकेंद्र निर्माण झाले असते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
BP, मधुमेह, हृदयविकाराच्या रुग्णांना मोठा दिलासा! 39 अत्यावश्यक औषधांच्या किंमती केंद्राने निश्चित केल्या
भाजपने मात्र या निवडणुकीत आशुतोष तिवारी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी, संघटनात्मक अनुभव आणि स्थानिक गटबाजीपासून दूर असलेली प्रतिमा लक्षात घेऊन त्यांना संधी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच मतदारसंघातील जातीय समीकरणेही या निर्णयामागे महत्त्वाची ठरल्याचे सांगितले जात आहे.
मात्र भाजपसमोर आता सर्वात मोठे आव्हान म्हणजे नरोत्तम मिश्रा यांचे समर्थक आणि त्यांचे मजबूत संघटनात्मक जाळे पुन्हा पक्षाच्या बाजूने उभे करणे. ग्वाल्हेर-चंबळ पट्ट्यात मिश्रा यांनी अनेक वर्षांत उभारलेले कार्यकर्त्यांचे जाळे त्यांच्या वैयक्तिक नेतृत्वाशी जोडलेले मानले जाते. त्यामुळे पोटनिवडणुकीत या नाराजीचा किती परिणाम होतो, याकडे आता संपूर्ण मध्य प्रदेशच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
