BP, मधुमेह, हृदयविकाराच्या रुग्णांना मोठा दिलासा! 39 अत्यावश्यक औषधांच्या किंमती केंद्राने निश्चित केल्या

राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण मार्फत 39 अत्यावश्यक औषधांच्या फॉर्म्युलेशनच्या कमाल किरकोळ किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design 33

The Centre fixed the prices of medicines : उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, HIV तसेच डोळ्यांच्या संसर्गावरील औषधे नियमितपणे घेणाऱ्या लाखो रुग्णांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण मार्फत 39 अत्यावश्यक औषधांच्या फॉर्म्युलेशनच्या कमाल किरकोळ किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ही औषधे सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक किमतीत विकता येणार नाहीत. या निर्णयामुळे रुग्णांवरील उपचारांचा आर्थिक भार कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रसायन आणि खत मंत्रालयाने 8 जुलै रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ड्रग्स (प्राइस कंट्रोल) ऑर्डर, 2013 अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक औषधे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे आणि उपचाराचा खर्च कमी करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

या आजारांवरील औषधांचा समावेश

NPPA ने निश्चित केलेल्या कमाल किंमतींमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, HIV आणि डोळ्यांतील संसर्गावरील औषधांचा समावेश आहे. या गंभीर आजारांवर नियमित उपचार घेणाऱ्या लाखो रुग्णांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार असून, त्यांच्या मासिक औषध खर्चातही काही प्रमाणात बचत होण्याची शक्यता आहे.

लोकशाही संपवून राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा प्रयत्न , 850 खासदारांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

जादा दर आकारल्यास कठोर कारवाई

सरकारने औषध उत्पादक कंपन्या आणि विक्रेत्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. निश्चित केलेल्या कमाल किरकोळ किंमतीपेक्षा जास्त पैसे आकारल्यास ग्राहकांकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम परत करावी लागेल. याशिवाय त्या रकमेवर व्याजही भरावे लागणार आहे. ही कारवाई ड्रग्स (प्राइस कंट्रोल) ऑर्डर, 2013 आणि आवश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत केली जाणार असल्याने औषध कंपन्या आणि विक्रेत्यांकडून मनमानी दर आकारण्यावर आळा बसणार आहे.

मेडिकल स्टोअरसाठीही नवा नियम

NPPA ने सर्व मेडिकल स्टोअर आणि औषध विक्रेत्यांना औषधांच्या अधिकृत किंमतींची यादी ग्राहकांना सहज दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक केले आहे. यामुळे ग्राहकांना औषधांची अधिकृत किंमत सहज समजेल आणि जादा दर आकारण्याच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल. तज्ज्ञांच्या मते, अत्यावश्यक औषधांच्या कमाल किरकोळ किंमती निश्चित करण्याचा हा निर्णय दीर्घकालीन आजारांवर नियमित औषधे घेणाऱ्या रुग्णांसाठी विशेष दिलासादायक ठरणार आहे. उपचारांचा खर्च कमी होण्याबरोबरच औषधांच्या किमतींमध्ये पारदर्शकता वाढेल आणि सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक औषधे अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील.

follow us