फिट दिसणं म्हणजे हृदय निरोगी असतंच असं नाही; हृदयविकाराचा धोका वाढवणारे घटक कोणते?

नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैली असूनही हृदयविकाराचा धोका पूर्णपणे टळत नाही. नक्की काय आरोग्यावर परिणाम करतं?

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 10T173706.083

Heart Disease Risk Factors : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर फिटनेस आणि हृदयाच्या आरोग्याबाबत (Nana) पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नाना पाटेकर हे साधी राहणी, घरचं जेवण, शेतातील कामं आणि सक्रिय जीवनशैलीसाठी ओळखले जात होते. मात्र, एखादी व्यक्ती बाहेरून तंदुरुस्त दिसत असली किंवा नियमित शारीरिक श्रम करत असली, तरी तिचं हृदय पूर्णपणे निरोगी असेलच असं नाही. त्यामुळे केवळ फिट दिसणं म्हणजे हृदयविकाराचा धोका टळणं, असा समज करून घेणं योग्य ठरत नाही.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य वजन राखणं यामुळे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. मात्र, या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका पूर्णपणे संपत नाही. उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेलं कोलेस्ट्रॉल, मूत्रपिंडाचे विकार आणि काही गंभीर आजार सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणं न दाखवता शरीरात वाढू शकतात. त्यामुळे एखादी व्यक्ती रोज शेतात काम करत असेल, भरपूर चालत असेल किंवा शारीरिकदृष्ट्या सक्रिय असेल, तरी तिच्या शरीरातील इतर धोकादायक घटकांकडे दुर्लक्ष करून चालत नाही.

Video : हृदयाचा सर्वात मोठा शत्रू कोण?, सुप्रसिद्ध कार्डियाक सर्जन डॉ. इब्राहिम पटेल यांनी सांगितलं कारण

हृदयविकाराचा धोका वाढवणारे घटक केवळ लठ्ठपणा, जंक फूड, धूम्रपान किंवा बैठी जीवनशैली इतकेच मर्यादित नाहीत. उच्च रक्तदाब, रक्तातील एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण, मधुमेह, शरीरातील दीर्घकालीन जळजळ आणि आनुवंशिकता यांचाही हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. विशेष म्हणजे, यापैकी काही समस्या बराच काळ कोणतीही स्पष्ट लक्षणं न दाखवता कायम राहू शकतात. त्यामुळे व्यक्तीला आपण पूर्णपणे निरोगी असल्याचं वाटत असलं, तरी रक्तवाहिन्यांचं हळूहळू नुकसान होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय, वाढत्या वयानुसार हृदयविकाराचा धोका वाढत असल्याने केवळ व्यायाम आणि आहारावर अवलंबून राहणं पुरेसं ठरत नाही.

या पार्श्वभूमीवर नियमित आरोग्य तपासणीचं महत्त्व अधोरेखित होतं. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक असला, तरी रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी यांची वेळोवेळी तपासणी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. विशेषतः वय वाढत असताना आणि कुटुंबात हृदयरोगाचा इतिहास असताना आरोग्याकडे अधिक लक्ष देणं गरजेचं ठरतं. कोणतीही लक्षणं जाणवत नसली, तरी तपासण्यांमुळे संभाव्य धोके लवकर ओळखता येतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार सुरू करता येतात.

follow us