Meeting between Nilesh Lanke and Ram Shinde : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असले तरी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज घेण्यात आल्याने निवडणूक बिनविरोध होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी महत्त्वाचे भाष्य करत, निवडणूक बिनविरोध करायची असेल तर सर्व इच्छुकांना विश्वासात घेऊन एकमताने चर्चा करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच, बिनविरोध निवडणुकीत नेमकी अडचण कोणाची आहे आणि कोण अडथळा ठरत आहे, याचा शोध घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
राम शिंदे म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आपली इच्छा असून आपण यासाठी सकारात्मक आहोत. मात्र, निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. जिल्ह्यातील सात उमेदवार स्वतःच्या पातळीवर प्रचार करत असून, काहीही झाले तरी निवडणूक लढवायची, असा निर्धार काही इच्छुकांनी केला आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीसाठी पुढाकार घेणाऱ्यांनी सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. काहींना चर्चेत सहभागी करून घेतले जात आहे, तर काहींना डावलले जात असल्याची भावना निर्माण झाल्यास अडचणी वाढू शकतात, असेही त्यांनी सूचित केले.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विचारविनिमय करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी बिनविरोध निवडणुकीची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र होते. मात्र, जिल्हा बँकेत सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत सर्व संबंधितांनी स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे. गडाख यांनीही या प्रक्रियेत लक्ष घालून समन्वय साधण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राम शिंदे यांनी केले.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस बरसण्याचा अंदाज
यावेळी निलेश लंके यांच्यासह काही इच्छुकांनी आपली भेट घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा केल्याचे शिंदे यांनी सांगितले. सदाशिवराव लोखंडे हेही भेटणार होते; मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. बिनविरोध निवडणुकीसाठी सर्वांमध्ये एकवाक्यता असणे महत्त्वाचे आहे. मात्र, प्रत्येक इच्छुक स्वतंत्रपणे प्रचार करत असल्याने एकमताचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन चर्चेतून मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी आपल्याशी यापूर्वी चर्चा केली होती. त्यानंतर मात्र या विषयावर पुढील चर्चा झालेली नाही, असेही राम शिंदे यांनी स्पष्ट केले. 5 ऑक्टोबरनंतर चर्चा करण्याबाबत बोलणे झाले होते; मात्र अद्याप समन्वयाची ठोस प्रक्रिया पुढे सरकलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीतून माघार घेण्याची अंतिम मुदत 21 तारखेपर्यंत असल्याने पुढील काही दिवसांत काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक बिनविरोध करायची असेल, तर सर्व इच्छुकांना विश्वासात घेऊन समन्वय साधणे आवश्यक आहे. अन्यथा निवडणूक बिनविरोध होण्याबाबत अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता आहे.
