राज्यभरातील दूध भेसळ रॅकेट उद्ध्वस्त; तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईत 13 आरोपी जेरबंद

अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत पाच जिल्ह्यांमध्ये छापे टाकत 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

ChatGPT Image Jul 5, 2026, 04_01_09 PM

ChatGPT Image Jul 5, 2026, 04_01_09 PM

Milk adulteration racket busted : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध भेसळ माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली असून, अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत पाच जिल्ह्यांमध्ये छापे टाकत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कठोर आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी राज्यभर पसरलेल्या दूध भेसळीच्या रॅकेटविरोधात थेट मोहीम उघडली.

राज्यातील विविध भागांतून भेसळयुक्त दूध पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्याशी समन्वय साधत अत्यंत गुप्तपणे कारवाईची आखणी केली. रविवारी पहाटे अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पुणे (मंचर), अहिल्यानगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर (सिल्लोड) आणि सोलापूर (अकलूज) या पाच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी केली. अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली.

नागपुरातील धंतोलीतून एकाच कुटुंबातील पाच सदस्य बेपत्ता; शेवटचे लोकेशन पुण्यात, पोलिसांचा शोध सुरू

तपासादरम्यान उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर हे या संपूर्ण गैरव्यवहाराचे प्रमुख केंद्र असल्याचे समोर आले. याशिवाय खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांतील विविध ठिकाणीही छापे टाकण्यात आले. या भागांतून राज्यभर रासायनिक भेसळयुक्त दुधाचा पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीत भेसळीची धक्कादायक पद्धत उघडकीस आली. आरोपी 1000 लिटर शुद्ध दुधात सुमारे 500 लिटर रासायनिक मिश्रित पाणी मिसळत होते, तर 500 लिटर दुधात 300 लिटरपर्यंत भेसळ केली जात होती. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये दुधाचे प्रमाण आणि घट्टपणा वाढवण्यासाठी वापरले जाणारे वासरहित शाम्पू, दूध पावडर आणि विविध घातक रसायनांचा समावेश आहे. या रसायनांचे पाण्यासोबत मिश्रण करून ते दुधात मिसळले जात होते. त्यानंतर हे भेसळयुक्त दूध नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बाजारात आणि ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवले जात असल्याचे तपासात आढळून आले.

या प्रकरणात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या टोळीतील 13 प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे राज्यातील दूध भेसळ करणाऱ्या इतर टोळ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

Exit mobile version