Milk Price Hike Maharashtra: राज्यात सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चात आता आणखी वाढ होणार आहे. गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 4 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने घेतला आहे. याशिवाय दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही 10 टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत. येत्या सोमवार (16 नोव्हेंबर) पासून नवीन दर लागू केले जाणार आहेत.
पुण्यातील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी) येथे दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पार पडली. संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत दूध दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला राज्यातील प्रमुख सहकारी आणि खासगी दूध संघांचे सुमारे 50 प्रतिनिधी उपस्थित होते.
दूध दरवाढीमागे उत्पादन आणि वितरण खर्चात झालेली वाढ हे प्रमुख कारण असल्याचे संघाकडून सांगण्यात आले. गेल्या काही काळात डिझेलचे दर, वाहतूक खर्च, साखरेच्या किमती, पॅकिंग साहित्य आणि मनुष्यबळावरील खर्च वाढला आहे. त्याचबरोबर दूध खरेदी दरातही वाढ झाल्याने विक्री दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
एनव्हिडियाच्या सीईओंच्या कथित प्रेमप्रकरणाने जगभर खळबळ, कंपनीच्या बाजारमूल्याला मोठा फटका
या दरवाढीमुळे दूध उत्पादन, पॅकिंग आणि वाहतुकीसाठी होणाऱ्या वाढीव खर्चाचा ताळमेळ साधता येईल. तसेच दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होईल, असा दावा दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने केला आहे.
