खंडणीसाठी माझ्या भाऊ-पुतण्याला मारहाण, मंत्री अतुल सावे यांचा गंभीर आरोप, कठोर कारवाईची मागणी

स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी खंडणीच्या उद्देशातून भावावर आणि पुतण्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप मंत्री अतुल सावे यांनी केला आहे.

Untitled Design   2026 09 11T113225.346

Untitled Design 2026 09 11T113225.346

Minister Atul Save makes a serious allegation : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते अतुल सावे यांच्या सख्ख्या भावाला आणि पुतण्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. शेती आणि रस्त्याच्या वादातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात अतुल सावे यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी खंडणीच्या उद्देशातून हा हल्ला केल्याचा गंभीर आरोप मंत्री अतुल सावे यांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या बिडकीन पोळी ठाण्याच्या हद्दीतील नायगाव खंडेवाडी परिसरात ही घटना घडली. मारहाणीत अमेय अजित सावे आणि अजित मोरेश्वर सावे हे दोघे जखमी झाले आहेत. घटनेनंतर दोघांनाही सुरुवातीला बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या अमेय सावे यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.

अतुल सावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पुतण्याचा खंडेवाडी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून काँक्रीट प्लांट सुरू आहे. आज अचानक काही जणांनी त्यांची गाडी अडवून वाद घालण्यास सुरूवात केली. रस्त्याबाबत काही समस्या असेल तर चर्चा करून मार्ग काढू, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊ किंवा आवश्यक असल्यास मोजणी करू, अशी भूमिका अतुल सावे यांच्या भावाने घेतली. मात्र, समोरच्या व्यक्तींनी काहीही ऐकून न घेता धक्काबुक्की केल्याचा आरोप सावे यांनी केला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचे संकट, मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

वाद सुरू असताना अमेय सावे हे समजावण्यासाठी पुढे गेले. त्यावेळी त्यांच्यावर जोरदार हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. बुलेट मोटारसायकलच्या रॉडसह हातातील कांद्याने देखील मारहाण करण्यात आल्याचे अतुल सावे यांनी सांगितले. या मारहाणीत अमेय सावे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून जखमेवर टाके घालण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू असल्याचे देखील सावे यांनी म्हटले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींची विचारपूस आणि जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. घटनेशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ पोलिसांकडे दिल्याचे देखील अतुल सावे यांनी सांगितले. दरम्यान, या हल्ल्यामागे खंडणीच्या उद्देशाने अशा प्रकारचे प्रकार केले जात असल्याचा देखील आरोप सावे यांनी केला आहे.

मोठी बातमी, मनोज जरांगेंविरोधात ED कडे तक्रार; 1000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अतुल सावे यांनी केली आहे. आपल्या वाहनचालकाला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे.

राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या या हल्ल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. नेमका वाद रस्त्याचा आणि शेतीचा होता की या हल्ल्यामागे खंडणीचे कारण होते, हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. सध्या अतुल सावे यांचा पुतण्या गंभीर जखमी असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Exit mobile version