महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचे संकट, मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील दोन दिवस वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 11T103813.424

Threat of stormy rains returns to Maharashtra : सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी देशातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याचे अद्याप ठोस संकेत मिळालेले नाहीत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील दोन दिवस वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या मध्यापासून देशातून नैऋत्य मोसमी पावसाच्या माघारीची प्रक्रिया सुरू होते. यंदाही मान्सून नियोजित वेळेत परतण्याचा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, बदलत्या हवामान परिस्थितीमुळे मान्सूनचा मुक्काम आणखी काही काळ लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही भागांत मुसळधार पावसासह वीज पडण्याचा धोका व्यक्त करण्यात आला असून, मध्य प्रदेशातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात देशातील अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप दिली होती. काही ठिकाणी काही तास, तर काही भागांत एक-दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र, आजपासून हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून 12 आणि 13 सप्टेंबर रोजी देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 14 सप्टेंबरला पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, 15 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाच्या हालचाली वाढू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातही पुढील काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ही जारी करण्यात आला आहे. 11 सप्टेंबर रोजी नाशिक घाट परिसरासह परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

मोठी बातमी, मनोज जरांगेंविरोधात ED कडे तक्रार; 1000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

12 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा विस्तार आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दिवशी धुळे, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

13 सप्टेंबर रोजीही राज्यातील बहुतांश भागांत पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर तुलनेने कमी होण्याची शक्यता असली तरी नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ कायम ठेवण्यात आला आहे.

यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि काही ठिकाणी अचानक जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडांखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबणे टाळावे तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. शेतकरी आणि शेतमजुरांनीही हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन शेतीच्या कामांचे नियोजन करावे. एकूणच सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत मान्सून सक्रिय राहण्याची चिन्हे असून, मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया आणखी काही काळ लांबण्याची शक्यता आहे.

Tags

follow us