शिक्षकदिनानिमित्त जळगावमध्ये आयोजित (Gulabrao Patil) करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी आपल्या शाळांकडे वळवावेत, असा सल्ला त्यांनी दिला. यासाठी त्यांनी थेट भाजपच्या राजकारणाचा दाखला दिल्याने त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात बोलताना गुलाबराव पाटील यांनी भाजपवर उपरोधिक टीका केली. “ज्या पद्धतीने भाजपवाले आमचे लोक फोडतात, पक्ष फोडतात, या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात करतात, त्याच पद्धतीने मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी फोडले पाहिजेत,” असं ते म्हणाले.
दुधानंतर शाळा मुंढेंच्या रडारवर! 50 मीटर परिसरात हे पदार्थांवर बंदी अन् पिण्याच्या पाण्यावरही
मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या टिकवणं हे मोठं आव्हान बनलं असल्याचंही पाटील यांनी नमूद केलं. कुटुंब नियोजनाच्या बदललेल्या संकल्पनेचा संदर्भ देत त्यांनी “हम दो हमारे दो और इंग्लिश मे जाने दो” अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमस्थळी हशा पिकला.
दरम्यान, सरकारी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये स्पर्धा असतानाच आता खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही मोठी स्पर्धा निर्माण झाली असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होण्यामागची कारणं गांभीर्यानं समजून घेण्याची गरज असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित झालं.
गुलाबराव पाटील यांचं भाजपसोबतचं राजकीय संबंध आणि यापूर्वी त्यांनी भाजपवर केलेली टीका पाहता, त्यांच्या या वक्तव्याकडे वेगळ्या राजकीय अंगानेही पाहिलं जात आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावेत, हा संदेश देताना त्यांनी भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणाचा दिलेला संदर्भ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
