Murder of a pregnant woman : कला केंद्रात झालेल्या वादातून एका गर्भवती महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या पोटातील अर्भकाचाही मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याची माहिती आहे. चाळीसगाव-धुळे महामार्गालगत गरताडबारी येथील निर्जन परिसरात या महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृत महिलेची ओळख पटवली असून पिंकी हनुमंत काटकर (वय 31, रा. रोहा, जि. रायगड) असे तिचे नाव असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा मोहाडी नगर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत उलगडा केल्याचा दावा केला असून मुख्य संशयितासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी एक महिला आणि एका पुरुष संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सफराज उर्फ शफीक अलीम मोमीन (वय 38, रा. गांधीनगर, कळंब, जि. धाराशिव), आरिफ उर्फ खुज्या आसिफ शेख (वय 31, रा. इंदिरानगर, हावरगाव रोड, कळंब), स्वाती उर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (वय 28, रा. सप्तसूर कला केंद्र कॉलनी, जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि लक्ष्मी बालाजी पवार (वय 30, रा. बसस्थानक डेपोच्या पाठीमागे, कळंब, जि. धाराशिव) यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जामखेड येथील एका कला केंद्रात महिला आणि पुरुषांमध्ये झालेल्या वादातून या हत्येचा कट रचण्यात आल्याचा संशय आहे. मात्र हा वाद नेमका कशावरून झाला, मृत महिला आणि संशयितांचा एकमेकांशी काय संबंध होता आणि हत्या करण्यामागील नेमके कारण काय होते, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
तुम्ही वार केल्यावर आम्ही पेटून उठू, सहकाऱ्यांना नोटीस आल्यानंतर मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
22 सप्टेंबर रोजी डायल 112 वर गरताडबारी परिसरात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मोहाडी नगर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. निर्जन परिसरात एका महिलेचा पूर्णपणे जळालेला मृतदेह आढळल्याने सुरुवातीला तिची ओळख पटवणे हेच पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते. पोलिसांनी विविध पातळ्यांवर तपास सुरू करत मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालातून संबंधित महिला गर्भवती असल्याचे आणि तिच्यासोबत पोटातील अर्भकाचाही मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याने प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली.
यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. मिळालेल्या पुराव्यांची सांगड घालत पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत चार संशयितांपर्यंत पोहोचून त्यांना अटक केली. या प्रकरणातील अन्य दोन संशयितांचा शोध सुरू असून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून विविध पथकांच्या माध्यमातून तपास केला जात आहे.
या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा क्रमांक 322/2026 दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयित सफराज मोमीन याच्याविरोधात धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी नगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा गोपीचंद पाटील आणि त्यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
जे पाहिलंस ते विसर, नाहीतर तुलाही… केतन अग्रवाल प्रकरणात प्रत्यक्षदर्शीच्या जबाबातून धक्कादायक दावा
कला केंद्रातील वादापासून सुरू झालेलं हे प्रकरण गर्भवती महिलेच्या कथित हत्येपर्यंत नेमकं कसं पोहोचलं, या घटनेमागे पूर्वनियोजित कट होता का, मृत महिला आणि संशयितांमध्ये यापूर्वी कोणता वाद होता आणि या संपूर्ण प्रकरणात फरार संशयितांची नेमकी भूमिका काय होती, या प्रश्नांची उत्तरं आता पोलिस तपासातून समोर येणं बाकी आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींवरील आरोप अद्याप तपासाधीन असून पुढील चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेतून प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम अधिक स्पष्ट होणार आहे.
