तुम्ही वार केल्यावर आम्ही पेटून उठू, सहकाऱ्यांना नोटीस आल्यानंतर मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

आपल्या विरोधात मोठं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप करत जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 28T130739.132

Manoj Jarange’s warning to the government : सावध राहा, सतर्क राहा, रात्र वैऱ्याची आहे. षडयंत्र रचलं जात असून काम करणाऱ्या लोकांना अडचणीत आणण्याचा आणि दबावातून चौकश्या सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आपल्या सहकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. एकजूट राहा, संकटाला तोंड देण्याची हिंमत ठेवा, आपलं कोणी नाही, आपले आपणच आहोत, असं आवाहन करतानाच सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला असून या काळात आपल्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. मेलो तरी चालेल, पण त्यांना शरण जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आपल्या विरोधात मोठं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप करत जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे आणि या कालावधीत आपल्याविरोधात अफवा पसरवून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र मराठा समाज आपल्याला एकटं पडू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मी समाजाला मायबाप म्हटलं आहे. त्यामुळे समाज माझ्या पाठीशी उभा राहील, असं त्यांनी सांगितलं. सरकारकडून जेवढा त्रास दिला जाईल, त्याला तितक्याच ताकदीने उत्तर दिलं जाईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

सहकाऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसांवर प्रतिक्रिया देताना आंदोलनात असणाऱ्यांना त्रास होणारच आहे, असं जरांगे म्हणाले. या सगळ्यामागील धागेदोरे आपण शोधले असून योग्य वेळी पुराव्यांसह माहिती समोर आणणार असल्याचा दावाही त्यांनी केला. सरकारने तीन महिन्यांचा वेळ घेतला असून या काळात आंदोलनाला कमकुवत करण्याचा प्रयत्न होईल, असा आरोप त्यांनी केला. आम्हाला घायाळ करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घायाळ होणार नाही. तुम्ही वार केला तर आम्ही पेटून उठू. कितीही त्रास झाला तरी सहन करू, पण शरण जाणार नाही. तुरुंगात जायची वेळ आली तरी तयार आहोत. मराठा समाजाला कोणाच्या दावणीला बांधणार नाही आणि या भूमिकेपासून हटणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

जे पाहिलंस ते विसर, नाहीतर तुलाही… केतन अग्रवाल प्रकरणात प्रत्यक्षदर्शीच्या जबाबातून धक्कादायक दावा

काही बैठका आणि त्यामध्ये कथितरीत्या देण्यात आलेल्या सूचनांवरही जरांगे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले. मुंबईत कुठे आणि कोणत्या बैठका झाल्या, याची माहिती योग्य वेळी जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यकर्त्यांनी आपल्याविरोधात बोलणाऱ्या कोणत्याही जाती-धर्मातील लोकांकडे द्वेषाने न पाहता त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे, असंही ते म्हणाले. आपण मराठा समाजाच्या कल्याणासाठी लढत असून त्यामुळे आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपण मागे हटणार नाही, हे सरकारला माहीत असल्यामुळेच आपल्याविरोधात षडयंत्र सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

याचवेळी पुढील तीन महिने आपण शांत राहणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. तीन महिने मी काही बोलणार नाही. शांत राहणार आहे. त्यानंतर योग्य वेळी सर्व काही बोलणार, असा इशारा त्यांनी दिला. या काळात आपल्याविरोधात होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. अंतरवाली सराटीतील काही गावकऱ्यांच्या नाराजीवरही जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. गावातील लोकांनी आपल्याबाबत काहीही बोललं तरी त्याला प्रत्युत्तर देणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. अंतरवाली सराटीने मराठा आंदोलनासाठी मोठं योगदान दिलं असून या गावाने समाजासाठी संघर्ष केला आहे, त्यामुळे गावातील मतभेदांकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन त्यांनी समर्थकांना केलं.

गैरसमजातून काही गोष्टी घडल्या असतील, मात्र शेवटी ते आपलेच लोक आहेत आणि आपलं गाव आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. आंदोलन अंतरवाली सराटीतच व्हावं, अशी गावकऱ्यांची भूमिका असेल तर त्यांनी व्यासपीठ उभारावं, आपण आंदोलन करण्यासाठी तयार असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

follow us