वैभव चव्हाण मृत्यू प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक, CID किंवा SIT चौकशीची मागणी, सरकारला दिला इशारा!
वैभव याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटीमार्फत करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली.
Manoj Jarange takes an aggressive stance over the Vaibhav Chavan death case : बीडमधील नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण याच्या मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलं आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वैभव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वैभव याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटीमार्फत करण्याची मागणी केली. तसेच सरकारने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
वैभव चव्हाण याने पोलीस भरती प्रक्रियेतील क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. मात्र, त्यानंतर वैभव याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सरकारकडून पारदर्शक तपासाचं आश्वासन दिलं जात असलं, तरी तक्रारी करूनही योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
अजितदादांच्या निधनानंतर तटकरेंचा ‘तो’ गुप्त डाव; शिवसेना आमदाराचा दाव्याने राजकारणात खळबळ
वैभव याच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या फोटोंमध्ये जखमा दिसत असल्याचा दावा करत जरांगे यांनी, या प्रकरणात केवळ आत्महत्येच्या दृष्टिकोनातून तपास न करता मृत्यूमागील सत्य समोर आणलं पाहिजे, अशी भूमिका मांडली. या प्रकरणाचा CID किंवा SIT मार्फत तपास झाला पाहिजे आणि सरकारने कोणालाही पाठीशी घालू नये, असंही ते म्हणाले. दरम्यान, जरांगे यांनी येवला येथील कथित अत्याचारmप्रकरणाचाही उल्लेख केला. या प्रकरणात राजकीय स्तरावरील काही व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्याचा उल्लेख करत संबंधितांवर कठोर कारवाई करून त्यांना तुरुंगात डांबण्याची मागणीही त्यांनी केली. तसंच, या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याच्या भूमिकेवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा देत त्यांनी थेट गृहमंत्र्यांनाही या प्रकरणाची दखल घेण्याचं आवाहन केलं. मनोज जरांगे पाटील यांनी पुढे बोलताना सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकार केवळ पारदर्शक तपासाचं आश्वासन देत आहे, मात्र प्रत्यक्षात तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पुरुषाचे दोन पाय, सिम कार्ड; पोलिसांचा तपास अन् मैत्रीचा धक्कादायक शेवट
वैभव चव्हाण याच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या जखमांच्या फोटोंचा उल्लेख करत या मृत्यूमागील सत्य समोर येणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला राजकीय पाठबळ मिळता कामा नये, दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच तपासात हलगर्जीपणा झाल्यास सरकार आणि पोलीस प्रशासनाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी गृहमंत्र्यांना दिला.