आम्ही काठ्या घेऊन जंतर मंतरवर येणार; CJP च्या निवडणूक आयोगविरोधी आंदोलनाला दिलं आव्हान

निवडणूक आयोगाच्या विरोधात 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर होणाऱ्या CJP च्या आंदोलनाला आता नवं वळण मिळालं आहे.

News Photo   2026 10 09T215530.276

CJP Workers Detained in Delhi Protest

CJP Workers Detained in Delhi Protest : दिल्लीतील जंतर मंतरवर 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता हिंदू रक्षा दलानेही तिथं पोहोचण्याची घोषणा केली आहे. हिंदू रक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र तोमर उर्फ पिंकी चौधरी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत काठ्या घेऊन आंदोलनस्थळी येणार असल्याचं म्हटलं आहे. सनातन धर्माला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय परत जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतरवरील परिस्थितीकडे लक्ष लागलं आहे.

पिंकी चौधरी यांनी आपल्या व्हिडिओत देशभरातील हिंदुत्ववादी समर्थकांना जंतर मंतरवर पोहोचण्याचं आवाहन केलं आहे. कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते पुन्हा आंदोलनासाठी येत असल्याचा उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपण दिल्लीत जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या आवाहनाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला. भगव्या रंगाचा आदर करणारे आणि हिंदुत्ववादी विचारांशी सहमत असलेले लोक या आंदोलनात सहभागी होतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

या व्हिडिओतून पिंकी चौधरी यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. हिंदुत्ववादी समर्थकांचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप सरकारने तुरुंगात टाकलं तरी हिंदू समाजाच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भगव्या रंगाचा अपमान करणाऱ्यांना जंतर मंतरवर जाऊन धडा शिकवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे 10 ऑक्टोबरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

पिंकी चौधरी यांनी पोलिस अधिकारी आणि महिला पोलिसांशी संबंधित घटनांचाही आपल्या वक्तव्यात उल्लेख केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांची हत्या करणारे तसेच महिला पोलिस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग करण्याची भाषा त्यांनी वापरली. सनातनी बांधवांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. त्यांच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रतिसाद मिळत असून, यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते चर्चेत राहिले आहेत.

एमपीएससी आंदोलनावर फडणवीसांचा मोठा सवाल; भीमनवारांच्या राजीनाम्याबाबत स्पष्टच सांगितलं

दरम्यान, दिल्लीतील आंदोलनासाठी महाराष्ट्रातून निघालेल्या CJP कार्यकर्त्यांना रेल्वेतून उतरवून अज्ञात ठिकाणी नेण्यात आल्याचा आरोप पक्षाच्या महाराष्ट्र शाखेने केला आहे. निवडणूक आयोगाच्या कारभाराच्या विरोधात 10 ऑक्टोबर रोजी जंतर मंतरवर आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतून कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना झाल्याचं CJP महाराष्ट्राने म्हटलं आहे. मात्र, आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात असून त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा पक्षाने केला आहे.

दिल्लीकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याचं आणि जंतर मंतर परिसरातील काही मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आल्याचंही CJP महाराष्ट्राने म्हटलं आहे. हजरत निजामुद्दीन आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या गाड्यांबाबतही पक्षाने प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनांमुळे शांततापूर्ण आंदोलनाच्या घटनात्मक अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, रेल्वे गाड्या रद्द करण्यामागचं कारण आणि मेट्रो स्थानकं बंद ठेवण्याबाबतची अधिकृत माहिती या निवेदनात देण्यात आलेली नाही.

CJP महाराष्ट्राच्या राज्य प्रवक्त्या त्रिशा पुदके आणि राज्य प्रवक्ते सुशील कुमार यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या प्रकाराचा निषेध केला आहे. लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नागरिकांना आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातून दिल्लीला निघालेल्या कार्यकर्त्यांना रेल्वेतून उतरवून अज्ञात ठिकाणी नेल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकाराबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यासाठी आयोजित केलेलं आंदोलन शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गानेच होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

या सर्व घडामोडींनंतरही 10 ऑक्टोबर रोजी जंतर मंतरवरील आंदोलन होणार असल्याची भूमिका CJP महाराष्ट्राने कायम ठेवली आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत पक्षाने महाराष्ट्रातील नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे, अशी भूमिका प्रवक्त्यांनी मांडली आहे. दुसरीकडे, हिंदू रक्षा दलानेही त्याच दिवशी जंतर मंतरवर पोहोचण्याची घोषणा केल्याने आंदोलनस्थळी दोन गट आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी प्रत्यक्ष परिस्थितीबाबत अधिकृत माहिती समोर येणं आवश्यक आहे.

Exit mobile version