डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट! उत्तर-दक्षिण राज्यांबद्दल केलं मोठ वक्तव्य

Prakash Ambedkar on Delimitation :डिलिमिटेशन विधेयकावरुन देशात नवा संघर्ष पेटण्याची शक्यता; प्रकाश आंबेडकरांनी मांडला धक्कादायक मुद्दा.

News Photo   2026 11 28T190455.698

Prakash Ambedkar Delimitation

Prakash Ambedkar Delimitation Statement :  डिलिमिटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आता संसदेत त्यावर राजकीय संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या विधेयकाला सशर्त पाठिंबा दिल्याने विरोधकांच्या इंडिया आघाडीत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोरील राजकीय आव्हान वाढले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी डिलिमिटेशनच्या परिणामांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, या विधेयकामुळे देशात उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा नवा संघर्ष निर्माण होऊ शकतो.

प्रकाश आंबेडकर यांनी दक्षिण भारतातील राज्यांच्या लोकसंख्येवर आधारित प्रतिनिधित्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. दक्षिणेकडील राज्यांनी कुटुंब नियोजनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे लोकसंख्येवर नियंत्रण मिळवले. मात्र, आता त्याच राज्यांना लोकसभेतील जागांच्या पुनर्रचनेत राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीत नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. भारताची एकात्मता टिकवून ठेवायची असेल, तर दक्षिण भारतातील जनतेला संतुष्ट कसे ठेवणार, हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या प्रश्नाची जाणीव व्यक्त केली होती आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या आत्मचरित्रात त्याचा उल्लेख असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Delimitation Bill : पवारांच्या राष्ट्रवादीत पहिला राजीनामा पडला; विचारांशी केलेली गद्दारी

दरम्यान, संसदेत खासदारांच्या संख्येत वाढ करण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यांमधील नागरिक आपल्या लोकप्रतिनिधींच्या कामगिरीवर समाधानी नसताना केवळ खासदारांची संख्या वाढवून कोणता बदल साधला जाणार, असा सवाल त्यांनी केला. एका आंतरराष्ट्रीय बैठकीत बहुमत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा आपलाच पक्ष असल्याचे सांगितले गेल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांच्या मते, दक्षिण आणि उत्तर भारतातील संभाव्य संघर्ष रोखण्याची क्षमता डीएमके आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाकडे आहे. त्यामुळे या राजकीय समीकरणात दक्षिणेकडील पक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते.

याशिवाय, डिलिमिटेशन विधेयक पुन्हा संसदेत आणण्यामागे चीनशी संबंधित घडामोडींचाही संदर्भ असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये हे विधेयक मंजूर झाले नव्हते आणि आता नोव्हेंबरमध्ये ते पुन्हा आणले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. चीनकडून अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे 200 किलोमीटरपर्यंत अतिक्रमण झाल्याचा आरोप करत ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहावर नियंत्रण मिळवण्याच्या संभाव्य परिणामांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. चीनकडून नदीवर वीज निर्मिती प्रकल्प उभारले जात असून, भविष्यात भारताकडे येणारे पाणी रोखण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा दावा त्यांनी केला. पाण्याची गरज निर्माण झाल्यानंतर भारताला चीनशी तडजोड करण्यास भाग पाडले जाऊ शकते, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

Exit mobile version