Delimitation Bill : पवारांच्या राष्ट्रवादीत पहिला राजीनामा पडला; विचारांशी केलेली गद्दारी…

Delimitation Bill माझ्यासाठी पद सोडणे अवघड नाही; पण स्वतःच्या विचारांशी प्रतारणा करून पदावर राहणे अशक्य आहे.

  • Ninad K
  • Written By: Published:
Sharad Pawar Party After Delimitation Bill Support

First Resignation Letter Of Sharad Pawar Party After Delimitation Bill Support : देशातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करू शकणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना अर्थात परिसीमन विधेयकावरून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. या विधेयकाला पक्षाकडून पाठिंबा देण्याचे संकेत मिळत असल्याने पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. याच नाराजीतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात पहिला राजीनामा पडला आहे.

राष्ट्रवादीत पहिला राजीनामा देणारे कोण?

परिसीमन विधेयकाला पक्षाने पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया सेलचे माजी प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी पक्षाच्या भूमिकेशी असहमती व्यक्त केली आहे. परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय हा शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेशी विसंगत असल्याचे खामकर यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे पक्षातील वैचारिक भूमिका जपणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे.

राजीनामा पत्रात नेमकं काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलमध्ये प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करताना पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचा आणि पुरोगामी विचारांचा प्रसार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला. मात्र, आज पक्षाने डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाच्या मुद्द्यावर भाजपाला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासारख्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारेचा पाईक असलेल्या कार्यकर्त्याच्या मनाला अजिबात पटणारा नाही. पक्षाच्या निर्णयांशी मतभेद असू शकतात; परंतु विचारधारेशी तडजोड कशी करायची? सत्तेच्या सोयीसाठी वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिका आणि त्यातून कार्यकर्त्यांच्या भावनांचा होणारा अनादर याचा मी जाहीर निषेध करतो.

May be an image of text

आज प्रश्न केवळ एका विधेयकाला पाठिंबा देण्याचा नाही, तर पक्षाच्या वैचारिक भूमिकेचा आहे. भाजपाच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर कोणती भूमिका मांडायची? कालपर्यंत ज्या विचारसरणीविरोधात आपण लढत होतो, त्याच विचारसरणीला आज पाठिंबा देण्यामागची वैचारिक भूमिका काय आहे? सोयीनुसार वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे पक्षाची मूळ विचारधारा आणि पुरोगामी प्रतिमा कलंकित होत असल्याची खंत मला आहे. डिलिमिटेशन विधेयकाला दिलेला पाठिंबा हा सरकारच्या व्यापक राजकीय भूमिकेला आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयांनाही मूक संमती देण्याचा मार्ग ठरू नये, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. माझ्यासाठी पदापेक्षा विचार महत्त्वाचे आहेत, सत्तेपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे आणि राजकीय निष्ठेपेक्षा संविधाननिष्ठा महत्त्वाची आहे. त्यामुळे माझ्या पुरोगामी विचारांशी कोणतीही तडजोड करणे मला मान्य नाही.

याच वैचारिक भूमिकेतून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारण्यात यावा. यापुढे पक्षाने सत्ताधारी भाजपाच्या निर्णयांचे समर्थन करण्यात धन्यता मानावी की पुरोगामी विचारांची कास धरावी, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, माझा लढा पदासाठी नव्हता आणि यापुढेही नसेल. हा देश, हे संविधान आणि या देशातील लोकशाही वाचली पाहिजे, यासाठी मी पदावर असो वा नसो, पुरोगामी विचारांच्या बाजूने लढत राहणार आहे. आपणास पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!

विचारांशी केलेली गद्दारी आयुष्यभर सलत राहते

वरील पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरदेखील शेअर करण्यात आले असून, त्यावर खामकर यांनी मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात त्यांनी पदापेक्षा विचार मोठे… सत्तेपेक्षा स्वाभिमान मोठा असल्याचे सुरूवातीला नमुद केले आहे. तसेच वैचारिक भूमिका न पटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सोशल मीडिया सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देत असल्याचे खामकर यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

पत्रात पुढे ते लिहितात की, मी राजकारणात पदासाठी आलो नाही, तर विचारांसाठी आलो आहे. पुरोगामी विचारांचा पाईक म्हणून संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची बांधिलकी ही माझ्यासाठी केवळ भाषणातील शब्दांची सजावट नाही, तर माझ्या सार्वजनिक जीवनाचा मूलाधार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या विचारांशी जोडला गेलो, तेव्हा या पक्षाकडून पुरोगामी महाराष्ट्राची वैचारिक परंपरा अधिक ताकदीने पुढे नेली जाईल, अशी अपेक्षा होती. शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाविषयी आणि त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी आदर ठेवून मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले.पक्षाचे दोन तुकडे झाले तरी मुळ राष्ट्रवादी सोबत राहून सोशल मीडिया सेलचा बीड जिल्हा अध्यक्ष ते प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारीही पूर्ण निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजच्या राजकीय परिस्थितीत पक्षाने घेतलेली भूमिका माझ्या वैचारिक भूमिकेशी विसंगत आहे.
विशेषतः भाजपच्या राजकीय अजेंड्याशी संबंधित असलेल्या डिलिमिटेशन विधेयकाच्या समर्थनाच्या भूमिकेमुळे माझ्या मनात गंभीर वैचारिक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या राजकीय शक्तींच्या धोरणांशी आणि विचारसरणीशी आपण सातत्याने संघर्षाची भूमिका मांडत आलो, त्याच राजकीय भूमिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय समर्थनीय कसा ठरू शकतो…?
राजकारणात तडजोडी होऊ शकतात; पण प्रत्येक तडजोडीला वैचारिक समर्थन देता येत नाही. सत्तेची गणिते आणि राजकीय सोयी यापेक्षा विचारांची निष्ठा माझ्यासाठी महत्त्वाची आहे. माझा हा निर्णय कोणत्याही व्यक्तीविषयीचा द्वेष नाही, कोणत्याही पदाधिकाऱ्याविषयीची वैयक्तिक नाराजी नाही आणि कोणत्याही राजकीय लाभासाठी केलेले शक्तिप्रदर्शनही नाही. हा माझ्या सद्सद्विवेकबुद्धीचा आणि वैचारिक प्रामाणिकपणाचा निर्णय आहे म्हणूनच मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच सोशल मीडिया सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे.
माझ्यासाठी पद सोडणे अवघड नाही; पण स्वतःच्या विचारांशी प्रतारणा करून पदावर राहणे अशक्य आहे. यापुढेही माझी बांधिलकी कोणत्याही पक्षाच्या झेंड्याशी मर्यादित नसेल. ती संविधानाशी, लोकशाहीशी, पुरोगामी विचारांशी आणि सर्वसामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांशी असेल.  कारण माझा संघर्ष सत्तेसाठी नाही, विचारांसाठी आहे.  पद आज आहे, उद्या नसेल; पण विचारांशी केलेली गद्दारी आयुष्यभर सलत राहते. जय संविधान! जय महाराष्ट्र!
आपलाच….
रामेश्वर खामकर

 

follow us