‘हवामानाचा बोगस अंदाज दिला’; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्याविरोधात माजी आमदाराची पोलीस ठाण्यात तक्रार!

Complaint against Panjabrao Dakh; हवामान अंदाजांमुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होत असून अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याचा आरोप.

Complaint against Panjabrao Dakh over weather forecasts

Complaint against Panjabrao Dakh over weather forecasts: हवामानाचा अंदाज वर्तवणारे पंजाब डख पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या हवामान अंदाजांमुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होत असून अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याचा आरोप माजी आमदार भीमराव धोंडे (Bhimrao Dhonde) यांनी केला आहे. याप्रकरणी धोंडे यांनी बीडमधील आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून पंजाब डख यांच्या कामकाजाची काही प्रमुख मुद्द्यांच्या आधारे चौकशी करण्याची मागणी केली आहे.

डिलिमिटेशनमुळं लोकशाहीला मोठा धोका, राज्यसभेचं महत्त्व संपणार, घटना तज्ज्ञ उल्हास बापट काय म्हणाले?

पंजाब डख सोशल मीडिया आणि विविध व्हिडिओंच्या माध्यमातून सातत्याने पावसाचे अंदाज (Maharashtra Weather) व्यक्त करत असतात. अनेक शेतकरी या अंदाजांच्या आधारे पेरणी, फवारणी, पीक काढणी आणि इतर शेतीविषयक निर्णय घेतात. मात्र, प्रत्यक्ष हवामान आणि त्यांनी वर्तवलेले अंदाज यांच्यात तफावत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर आल्याचे धोंडे यांनी अर्जात म्हटले आहे.

नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चौकशीची मागणी?

भीमराव धोंडे यांनी आपल्या तक्रार अर्जात पंजाब डख यांनी यापूर्वी दिलेल्या हवामान अंदाजांची अधिकृत हवामान विभागाकडून पडताळणी करण्याची मागणी केली आहे. अंदाज व्यक्त करताना पावसाबाबत ठाम दावे करण्यात आले होते का, तसेच त्यातील अनिश्चिततेबाबत शेतकऱ्यांना योग्य माहिती दिली होती का, याचीही तपासणी करण्यास सांगितले आहे.

जिल्हा बँक निवडणूक : साताऱ्यात जमलं नाही ते जयकुमार गोरेंनी सोलापूरमध्ये करून दाखवलं…

याशिवाय, हवामान अंदाजांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी किंवा दुबार पेरणी केली का, शेतीची कामे पुढे ढकलली का आणि त्यामुळे त्यांना किती आर्थिक फटका बसला, याची माहिती गोळा करण्याची मागणी करण्यात आली आहे. यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर प्रसारित झालेल्या व्हिडिओ आणि संदेशांची तपासणी करून त्यातील तारखा व दाव्यांचे पुरावे जमा करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

पंजाब डख हवामानाचा अंदाज कोणत्या वैज्ञानिक माहितीच्या आधारे व्यक्त करतात, अधिकृत हवामान विभागाच्या आकडेवारीचा वापर करतात का आणि त्यामागे कोणती पद्धत आहे, याची चौकशी करण्याची मागणीही अर्जात आहे. अतिवृष्टी किंवा पावसाच्या खंडाच्या अंदाजांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झाला का, हेदेखील तपासण्यास सांगितले आहे.

तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो! रोहित पवारांचा भाजपसोबत जाण्यास विरोध, वेगळी वाट धरण्याचे संकेत

हवामान अंदाजांच्या माध्यमातून जाहिराती, प्रायोजकत्व किंवा अन्य व्यावसायिक स्वरूपात आर्थिक लाभ मिळत असल्यास त्याची कायदेशीर पडताळणी करावी, अशी मागणीही धोंडे यांनी केली आहे. आष्टी, पाटोदा, शिरूरसह बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे जबाब नोंदवून त्यांच्याकडील व्हिडिओ, स्क्रीनशॉट, संदेश आणि शेती खर्चाच्या पावत्यांसारखे पुरावे गोळा करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

चौकशीनंतर कारवाईची मागणी

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून शेतकऱ्यांचे म्हणणे आणि उपलब्ध पुरावे तपासावेत, अशी मागणी भीमराव धोंडे यांनी केली आहे. चौकशीत जाणीवपूर्वक दिशाभूल, फसवणूक किंवा अन्य कायद्याने दखलपात्र गुन्हा झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणाकडे पाठवावे, असेही त्यांनी अर्जात नमूद केले आहे.

डिलिमिटेशन विधेयक लोकशाहीसाठी मोठा धोका; मोदी सरकारला संपूर्ण सत्ता हवीय, मल्लिकार्जुन खर्गेंचा आरोप

आता या तक्रार अर्जाची आष्टी पोलीस प्रशासनाकडून कशी दखल घेतली जाते आणि पुढे कोणती पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या तक्रारीतील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.

follow us