Pune Police Suspended: रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाणे पुणे शहरातील तीन पोलिसांना महागात पडले आहे. या पार्टीतील पोलिसांचा सहभाग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर झालेल्या चौकशीत त्यांचे वर्तन पोलीस दलाच्या शिस्तीला धरून नसल्याचे समोर आले. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी तिघांवर निलंबनाची कारवाई केली.
जरांगेंची मुंबई आंदोलनाची हाक; अंतरवालीतील बैठकीनंतर मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शुभम विजय सुर्वे, तसेच पुणे शहर वाहतूक शाखेतील योगेश भागचंद एकशिंगे आणि अभिजित अनिल शिंदे यांचा समावेश आहे.
पीटा कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीच्या मुलाचा 2 जुलै 2026 रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत हे तिन्ही पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. पार्टीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर या प्रकाराची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.
विद्यानंद बापटांकडून DGP, पुणे पोलीस, मनपा अन् MPCB ला कायदेशीर नोटीस; अल्टिमेटमही दिला
या प्रकरणाची चौकशी करून पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी आपला अहवाल अपर पोलीस आयुक्तांकडे सादर केला. पोलिसाने आरोपीच्या कुटुंबीयांच्या कार्यक्रमात अशा प्रकारे सार्वजनिकरित्या सहभागी होणे हे पोलीस दलाच्या शिस्तीला आणि जबाबदारीच्या भूमिकेला धरून नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाची प्रतिमा खराब होईल, अशा प्रकारचे वर्तन केल्याचा ठपका ठेवत संजय पाटील यांनी शुभम सुर्वे, योगेश एकशिंगे आणि अभिजित शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
