Raakh Review : निर्घृण हत्येची अस्वस्थ करणारी कहाणी

Raakh Review-ही मालिका केवळ दोन मुलांच्या हत्येचा तपास नाही, तर मानवी मनाच्या काळोख्या कप्प्यांमध्ये डोकावणारा एक भयावह प्रवास आहे.

Raakh Review

Raakh Review

Raakh Review: ओटीटीवर क्राइम-थ्रिलर मालिका नवीन नाहीत. मात्र काही कथा अशा असतात की त्या केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांच्या मनात अस्वस्थतेची खोल जखम करून जातात. ‘राख’ ही (Raakh) अशीच एक मालिका आहे. सत्य घटनांपासून प्रेरणा घेत तयार करण्यात आलेली ही मालिका केवळ दोन मुलांच्या हत्येचा तपास नाही, तर मानवी मनाच्या काळोख्या कप्प्यांमध्ये डोकावणारा एक भयावह प्रवास आहे.

काय आहे ‘राख’ची कथा?

कथा घडते 1978 साली दिल्लीत. लेफ्टनंट कर्नल अशोक अरोरा (आमिर बशीर) आपल्या पत्नी मोना (सोनाली बेंद्रे), मुलगी सुमन आणि मुलगा साहिल यांच्यासोबत दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये राहतात. एका पावसाळी संध्याकाळी सुमन रेडिओ स्टेशनवर गायनासाठी निघते आणि साहिल तिच्यासोबत जातो. पण ते दोघेही रेडिओ स्टेशनवर पोहोचत नाहीत.

सुरुवातीला किरकोळ उशीर झाला, असे वाटणाऱ्या या घटनेचे रूपांतर काही तासांतच राष्ट्रीय खळबळ उडवणाऱ्या दुहेरी हत्याकांडात होते. दुसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह दिल्लीच्या परिसरात सापडतात आणि संपूर्ण देश हादरून जातो.

या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी एसआय जयप्रकाश जाटव (अली फजल) यांच्यावर येते. दुसरीकडे मुंबईत छोट्या-मोठ्या गुन्ह्यांत गुंतलेले बाबू उर्फ कुमार (आकाश मखिजा) आणि राज्जो (रामदीप यादव) यांची समांतर कथा उलगडत जाते. त्यांच्या गुन्हेगारी प्रवासाचा आणि दिल्लीतील हत्याकांडाचा नेमका काय संबंध आहे, याचा उलगडा मालिका पुढे करत राहते.


कथानकाची सर्वात मोठी जमेची बाजू

लेखक अनुशा नंदकुमार आणि संदीप साकेत यांनी सत्य घटनांवर आधारित कथा काल्पनिक स्वरूपात प्रभावीपणे उभी केली आहे. विशेष म्हणजे, मालिकेची सर्वात मोठी ताकद म्हणजे निर्मात्यांनी खुनींची ओळख लपवून ठेवण्याचा पारंपरिक मार्ग स्वीकारलेला नाही.

पहिल्याच भागात प्रेक्षकांना खुनी कोण आहेत याची कल्पना देऊन विश्वासात घेतले जाते. त्यामुळे “खुनी कोण?” हा प्रश्न गौण ठरतो आणि “ते असे का झाले?” हा प्रश्न केंद्रस्थानी येतो. यामुळे मालिका एक वेगळ्याच पातळीवर जाते.

फ्लॅशबॅक आणि तपासाच्या समांतर रचनेमुळे प्रत्येक भागात उत्सुकता टिकून राहते. जसजसे बाबू आणि राज्जोच्या भूतकाळाचे थर उलगडतात, तसतसे कथानक अधिक भीषण आणि अस्वस्थ करणारे बनते.


प्रोसित रॉय यांचे प्रभावी दिग्दर्शन

दिग्दर्शक प्रोसित रॉय यांनी मालिकेचा टोन सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत नियंत्रित ठेवला आहे. अनावश्यक नाट्य किंवा अतिनाट्यमय दृश्यांना फाटा देत त्यांनी वास्तववादी आणि अंगावर काटा आणणारी मांडणी केली आहे.

विशेषतः बाबूच्या बालपणाशी संबंधित दृश्ये, त्याची मानसिक घुसमट आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वातील हिंसक बाजू ज्या प्रकारे उलगडली जाते, ती प्रेक्षकांना अक्षरशः हादरवून सोडते. काही दृश्यांमध्ये तर बाबू फ्रेममध्ये दिसताच पुढे काय घडणार याची भीती वाटू लागते. हीच मालिकेच्या दिग्दर्शनाची खरी कमाल आहे.

मालिकेच्या काही मर्यादाही आहेत

मालिकेची गती काही ठिकाणी खूपच संथ वाटते. विशेषतः जयप्रकाश आणि त्यांच्या वडिलांमधील नात्यावर दिलेला भर काही प्रमाणात लांबलेला वाटतो.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित एक फ्लॅशबॅक प्रसंग कथानकासाठी महत्त्वाचा असला तरी त्याची मांडणी अधिक संक्षिप्त करता आली असती.तसेच सातव्या भागाच्या अखेरीस आलेला एक महत्त्वाचा फ्लॅशबॅक कथानकाच्या भावनिक शिखरावर थोडासा ब्रेक लावतो. काही प्रेक्षकांना तो प्रभावी वाटेल, तर काहींना तो अनावश्यकपणे अस्वस्थ करणारा वाटू शकतो.

अभिनय : मालिकेची खरी ताकद
अली फजलने आजवर अनेक आक्रमक आणि लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. मात्र ‘राख’मध्ये त्याने अत्यंत संयमी, संवेदनशील आणि वास्तववादी अभिनय केला आहे. तपास अधिकारी म्हणून त्याची धडपड आणि अंतर्गत संघर्ष प्रभावीपणे समोर येतो.

मात्र मालिकेचे खरे हिरो ठरतात आकाश मखिजा आणि रामदीप यादव. दोघांनीही आपल्या व्यक्तिरेखांमध्ये अक्षरशः जीव ओतला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, देहबोली आणि हिंसक मानसिकतेचे चित्रण इतके वास्तववादी आहे की अनेक प्रसंगांमध्ये ते अंगावर येते.

सोनाली बेंद्रेने दुःखाने खचलेल्या आईची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. तिचा स्क्रीन टाइम मर्यादित असला तरी प्रत्येक दृश्य लक्षात राहते. आमिर बशीर, दिव्या शर्मा, विवान शर्मा, राकेश बेदी, अंशुल चौहान, दिब्येंदू भट्टाचार्य आणि कल्याणी मुळे यांचाही अभिनय मालिकेला अधिक भक्कम बनवतो.

तांत्रिक बाजूही तितकीच दमदार

अजय जयंती आणि पार्थ पंड्या यांचे पार्श्वसंगीत कथानकातील तणाव वाढवण्याचे काम उत्तमरीत्या करते. सौम्यानंद साही यांचे छायाचित्रण विशेष उल्लेखनीय आहे. दिल्लीतील परिसर, जंगलातील दृश्ये आणि ताजमहाल परिसरातील सिक्वेन्सेस पडद्यावर प्रभावी दिसतात.1970 च्या दशकातील वातावरण उभे करण्यासाठी प्रॉडक्शन डिझाईन आणि वेशभूषेवर घेतलेली मेहनत स्पष्टपणे जाणवते. जर तुम्हाला वास्तववादी, भावनिक आणि मन हेलावून टाकणाऱ्या क्राइम ड्रामांची आवड असेल, तर ‘राख’ ही मालिका तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्की असली पाहिले. मी या वेब सिरिजला चार स्टार्स देतोय.
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक


का पाहावा ?
दमदार लेखन, प्रभावी दिग्दर्शन, भयावह वातावरणनिर्मिती आणि विशेषतः आकाश मखिजा व रामदीप यादव यांचा उत्कृष्ट अभिनय

का टाळावा ? क्राइम थ्रिलर आवडत नसेल तरच

थोडक्यात काय ? राख’ ही फक्त एक क्राइम थ्रिलर नाही; ती मानवी मनातील अंधार, हिंसा आणि सामाजिक वास्तवाचा अस्वस्थ करणारा दस्तऐवज आहे.

⭐ ⭐⭐⭐ 4/5

Exit mobile version