तुम्ही दहशतवादी कारवाया सुरू ठेवणार आणि चर्चा करा म्हणता?, राहुल गांधींनी पाकिस्तानला थेट सुनावलं

Rahul Gandhi on Pakistan Terrorism : पाकिस्तानकडून दहशतवादाला पाठिंबा मिळत असेल तर संवाद अशक्य, राहुल गांधींचं शिकागोत स्पष्ट भूमिका.

News Photo   2026 11 21T142236.078

Rahul Gandhi on Pakistan Terrorism

Rahul Gandhi on Pakistan Terrorism : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध (India) सुधारण्यासाठी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्यासाठी निश्चितच वाव आहे. मात्र, पाकिस्तानकडून भारतातील दहशतवादाला दिला जाणारा पाठिंबा हा दोन्ही देशांमधील संवादातील सर्वात मोठा अडथळा असल्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात बुधवारी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास भारताची तयारी असू शकते, पण त्यासाठी दहशतवादाचा प्रश्न सुटणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या भूमिकेतून अधोरेखित केले.

या कार्यक्रमात खुश नावाच्या पाकिस्तानी विद्यार्थ्याने राहुल गांधी यांना भारत आणि पाकिस्तान आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणापलीकडे जाऊन परस्पर हितासाठी एकत्र काम करू शकतात का, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये सहकार्याची शक्यता नक्कीच आहे. मात्र, पाकिस्तानकडून भारतातील दहशतवादाला मिळणारे प्रोत्साहन आणि पाठबळ ही गंभीर समस्या आहे. आपल्या देशातील निष्पाप नागरिकांची हत्या होत असताना पाकिस्तानशी संवाद साधणे भारताला स्वीकारणे अशक्य असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

आमच्याकडे पुरावे, देशद्रोह्यांना शिक्षा मिळणारचं, निवडणूक आयोगाच्या वादावरून राहुल गांधी मोदी-शहांना घेरलं

प्रसिद्ध अमेरिकन राज्यशास्त्रज्ञ प्राध्यापक रॉबर्ट पेप यांनी या संवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीला पवित्र संबोधत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली. निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे म्हणजे देशातील लोकशाही संपुष्टात आणण्यासारखे असेल, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे निवडणूक व्यवस्थेतील कथित त्रुटी आणि अनियमितता जनतेसमोर आणण्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक प्रक्रियेवर टीका करताना राहुल गांधी यांनी देशातील यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा आरोप केला. ही वस्तुस्थिती लोकांच्या लक्षात येईपर्यंत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष संघर्ष करत राहतील, असे त्यांनी सांगितले. या लढाईत कितीही राजकीय नुकसान सहन करावे लागले तरी माघार घेणार नसल्याचा संदेशही त्यांनी दिला. निवडणूक व्यवस्थेतील घडामोडी जनतेसमोर आणणे हेच विरोधकांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी या चर्चेतून स्पष्ट केले.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय G3 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी भारताच्या जागतिक स्थानाचा मुद्दा उपस्थित केला. भारताने जागतिक राजकारणात अधिक प्रभावी भूमिका बजावली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये काँग्रेस सत्तेत असती तर भारताचे पंतप्रधानही अशा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बैठकीच्या टेबलावर बसलेले असते, असा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना तडजोड करणारा पंतप्रधान अशा महत्त्वाच्या जागतिक व्यासपीठावर स्थान मिळवू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि जागतिक नेतृत्वाच्या भूमिकेवरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.

Exit mobile version