तुम्ही पंतप्रधान मोदींना आरोपी नंबर 4 हटवायला सांगा मी आंदोलन मागं घेतो, राहुल गांधींनी व्यापाऱ्यांपुढं ठेवली अट

Rahul Gandhi INDIA Alliance Rally : आंदोलन पुढे ढकलण्याची व्यापाऱ्यांची मागणी आली आणि राहुल गांधी यांनी थेट अशी अट ठेवली आहे.

News Photo   2026 10 26T214903.386

Rahul Gandhi INDIA Alliance Rally

Rahul Gandhi INDIA Alliance Rally : दिवाळीच्या खरेदीच्या हंगामात 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या सभेवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. सणासुदीच्या काळात आंदोलन झाल्यास बाजारपेठांमधील व्यवहारांवर परिणाम होईल, अशी चिंता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे. (INDIA ) त्यामुळे हे आंदोलन 10 नोव्हेंबरनंतर घ्यावं, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, या मागणीला उत्तर देताना राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत आक्रमक भूमिका मांडली.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीदरम्यान (SIR) कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ‘इंडिया’ आघाडीनं 1 नोव्हेंबरला आंदोलन आयोजित केलं आहे. या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणीही केली जाणार आहे. दरम्यान, दिल्लीतील व्यापारी संघटनांच्या मते, आंदोलनामुळे वाहतूक आणि बाजारपेठांमधील व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीच्या महत्त्वाच्या खरेदीच्या काळात व्यापाऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं.

चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष बृजेश गोयल यांनी यासंदर्भात राहुल गांधी यांना पत्र लिहिलं होतं. रामलीला मैदानापासून पाच किलोमीटरच्या परिसरात चांदणी चौक, सदर बाजार, चावडी बाजार आणि काश्मिरी गेट यांसारख्या मोठ्या बाजारपेठा आहेत. 6 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आणि 8 नोव्हेंबरला दिवाळी असल्याने या काळात सुमारे 25 हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. आंदोलनामुळे रस्ते बंद झाले आणि मेट्रो सेवा विस्कळीत झाली, तर ग्राहक बाजारात येणार नाहीत आणि सुमारे 10 हजार कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मोदी का बाप भी जायेगा! खरगेंच्या विधानाने वाद पेटला, अमित शाहांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

व्यापाऱ्यांच्या मागणीला उत्तर देताना राहुल गांधी यांनी दिल्लीतील व्यापाऱ्यांबद्दल आपुलकी व्यक्त केली, मात्र वाहतूक व्यवस्थेतील अडथळ्यांसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरलं. मेट्रो आणि रस्ते कोणी बंद केले, असा सवाल उपस्थित करत राजधानीतील अडथळ्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांचं मतच सुरक्षित नसेल, तर दुकानं, बचत आणि मुलांचं भविष्यही सुरक्षित राहणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यास सांगावं, असं आवाहन त्यांनी व्यापाऱ्यांना केलं.

राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांचा उल्लेख ‘आरोपी नंबर 4’ असा केला आणि त्यांना पदावरून हटवल्यास पुढील 30 सेकंदांत आंदोलन थांबवू, अशी भूमिका मांडली. मतदार याद्यांच्या फेरतपासणीतील कथित गैरप्रकारांवरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे. दुसरीकडे, आंदोलनाच्या काळात बाजारपेठांमध्ये होणाऱ्या संभाव्य नुकसानीबाबत व्यापारी संघटना चिंतेत आहेत. त्यामुळे राजकीय आंदोलन आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधांमधील संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

यापूर्वी कनॉट प्लेस आणि जंतरमंतर परिसरात झालेल्या आंदोलनांमुळे स्थानिक दुकानदारांचं दररोज 5 ते 7 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली होती. त्यानंतर प्रशासनाने जंतरमंतरवरील आंदोलनांची परवानगी रद्द करून रामलीला मैदानाचा पर्याय दिला होता. आता राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे 1 नोव्हेंबरचं आंदोलन पुढे ढकलण्याची शक्यता कमी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीच्या काळात दिल्लीत राजकीय आंदोलन आणि व्यापाऱ्यांच्या मागण्या यांवरून संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Exit mobile version