पश्चिम आशियातील तणावाचा विमानसेवेला फटका; एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेसने विमान उड्डाणे केली रद्द!
Air India Saudi Arabia Flights Suspended: सौदी अरेबियासाठीच्या आपल्या विमान सेवा 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत.
Air India Saudi Arabia Flights Suspended: एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने सौदी अरेबियासाठीच्या आपल्या विमान सेवा 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. या दोन्ही विमान कंपन्यांनी जेद्दाह, रियाध आणि दम्माम येथून ये-जा करणाऱ्या विमानसेवा स्थगित केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे वेळापत्रक बदलण्याचा आणि इतर मार्गाने प्रवास करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. हा निर्णय पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचं विमान कंपन्यांनी सांगितलं आहे. 10 ऑक्टोबरला रियाधच्या किंग खालिद विमानतळावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला होता.
ऑनलाइन बेटिंग अन् सायबर फसवणुकीवर ईडीची मोठी कारवाई, मुंबई-पुण्यासह 5 शहरांत 20 ठिकाणी छापेमारी
तिकिटाच्या तारखेत बदल करण्याची सुविधा
एअर इंडियाने 17 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, 15 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी बुकिंग केलेल्या आणि 9 ते 25 ऑक्टोबरदरम्यान प्रवास करायचे असलेल्या पात्र प्रवाशांना विशेष सुविधा देण्यात आली आहे. या प्रवाशांना 10 नोव्हेंबरपर्यंत कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता एकदा प्रवासाची तारीख बदलता येईल.
पर्यायी प्रवासासाठी एअर इंडियाच्या प्रवाशांना दुबई किंवा दोहा येथून ये-जा करणाऱ्या विमानांचा पर्याय निवडता येईल. तर एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी अबू धाबी, अल ऐन, बहरीन, दोहा, दुबई, कुवेत, मस्कत, रास अल खैमा, सलालाह आणि शारजा या ठिकाणांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दुष्काळामुळे ऊसतोड मजुरांचं स्थलांतर वाढलं; धारूरमध्ये मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर
मात्र, पर्यायी शहरातून प्रवास करायचा असल्यास त्या ठिकाणी पोहोचण्याची व्यवस्था प्रवाशांना स्वतः करावी लागेल. तसेच संबंधित देशाचे व्हिसा आणि प्रवेशासंबंधीचे नियम पाळणे आवश्यक असेल.
विमान रद्द झाल्यास पूर्ण परतावा
विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवास करता येत नसलेल्या प्रवाशांना तिकीट रद्द करून संपूर्ण पैसे परत मिळवण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. पश्चिम आशियातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जातील, असं एअर इंडियाने स्पष्ट केलं आहे. प्रवाशांची गैरसोय कमी करणे आणि त्यांना शक्य ते पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, यावर कंपनीचा भर आहे.
इंडिगो आणि अकासा एअरचीही उड्डाणे रद्द
सौदी अरेबियातील सुरक्षेच्या परिस्थितीमुळे इतर विमान कंपन्यांनीही त्यांच्या सेवांमध्ये बदल केले आहेत. इंडिगोने सौदी अरेबियासाठीची उड्डाणे रद्द ठेवण्याची मुदत 24 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. तर अकासा एअरने रियाधसाठीची उड्डाणे 24 ऑक्टोबरपर्यंत आणि जेद्दाहसाठीची उड्डाणे 21 ऑक्टोबर 2026 पर्यंत रद्द केली आहेत.
रिलायन्स, ब्लिंकिट आणि झोमॅटोला एफडीएचा दणका! संचालकासह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
दरम्यान, सौदी अरेबियाला जाण्याचे नियोजन केलेल्या प्रवाशांनी विमानतळाकडे निघण्यापूर्वी आपल्या विमानाची सद्यस्थिती तपासून घ्यावी. तिकीट बदल, परतावा आणि पर्यायी प्रवासाबाबत संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधणे महत्त्वाचे ठरणार आहे.