गांजाच्या नशेत एअर इंडियाचा पायलट! फुकेट-दिल्ली विमानप्रकरणात धक्कादायक खुलासे
फुकेटला जाणाऱ्या आधीच्या विमानप्रवासात मुख्य वैमानिकाने एका महिला कर्मचारीला फटकारल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
फुकेटहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या (Indigo) AI-2379 या विमानाची उड्डाणादरम्यान सुमारे ३०० फूट उंची अचानक कमी झाल्याच्या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. या घटनेत २० प्रवासी आणि चार कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीत विमानाच्या मुख्य वैमानिकाच्या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आल्याचे वृत्त आहे.
विमान अपघात तपासणी विभागाकडून (AAIB) या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ‘एनडीटीव्ही’ने एअर इंडियाच्या अंतर्गत विमान सुरक्षा अहवालाचा दाखला देत दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य वैमानिकाच्या शरीरात गांजाचे अंश आढळले आहेत. दिल्लीतील प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या पुष्टीकारक तपासणीत दोन वेळा गांजाचे अंश आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
उड्डाणादरम्यान वैमानिक कॉकपिटच्या तळावर
विमानाची उंची अचानक ३०० फूटांनी कमी झाली, त्या वेळी मुख्य वैमानिक आपल्या आसनावर नसून कॉकपिटच्या तळावर पडल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते. दिल्ली विमानतळावर विमान उतरवल्यानंतरही त्याला स्वतःच्या पायावर उभे राहणे कठीण जात होते. नमुना तपासणीसाठी त्याला तपास अधिकाऱ्याच्या मदतीची आवश्यकता भासल्याचे अहवालात म्हटले आहे. मुख्य वैमानिकाची प्रकृती पाहता सहवैमानिकाने विमानाची सूत्रे सांभाळल्याचेही समोर आले आहे.
प्रवाशांना चित्रीकरण करण्यास मनाई
विमान अचानक खाली आल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. या घटनेनंतर मुख्य वैमानिकाने प्रवाशांना घटनेचे चित्रीकरण करण्यास मनाई केल्याचे सांगण्यात येते. या प्रकारानंतर विमानातील कर्मचारी आणि वैमानिक यांच्यातील वर्तनासंदर्भातही चौकशी करण्यात येत आहे.
महिला कर्मचाऱ्याने मागितली होती मागील भागात नियुक्ती
फुकेटला जाणाऱ्या आधीच्या विमानप्रवासात मुख्य वैमानिकाने एका महिला कर्मचारीला फटकारल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर फुकेटमध्ये संपूर्ण पथकासाठी मेजवानी आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
मात्र, फुकेटहून दिल्लीकडे परतताना संबंधित महिला कर्मचारी मुख्य वैमानिकापासून दूर राहण्यासाठी विमानाच्या मागील भागात आपली नियुक्ती करण्याची विनंती केल्याचे समोर आले आहे. याशिवाय, किमान एका विमान कर्मचाऱ्याने मुख्य वैमानिक गांजा सेवन करत असल्याची तक्रार अधिकृतरीत्या केल्याचेही वृत्त आहे.
वैमानिकाचा गांजा सेवनास नकार
दरम्यान, तपासणीमध्ये गांजाचे अंश आढळल्यानंतरही मुख्य वैमानिकाने गांजा सेवन केल्याचा आरोप फेटाळला आहे. एअर इंडियाच्या अंतर्गत विमान सुरक्षा अहवालात त्याने आपली बाजू मांडली आहे. कौटुंबिक कारणांमुळे झोपेची समस्या निर्माण झाली होती आणि त्यासाठी डॉक्टरांनी औषधे दिली होती, असा दावा त्याने केला आहे. फुकेटमधील मुक्कामादरम्यानही पुरेशी झोप मिळाली नसल्याचे त्याने सांगितले.
दिल्लीहून रात्री १२.१० वाजता सुटणाऱ्या विमानासाठी रात्री १० वाजल्यापासून तयारी करावी लागत होती. फुकेटला पोहोचल्यानंतर हॉटेलपर्यंत जाण्यातच सुमारे दोन तास जात होते. त्यामुळे दिवसाची झोप पूर्ण होत नव्हती. परतीच्या विमानासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे तीन वाजता उठावे लागत असल्याचेही त्याने चौकशीदरम्यान सांगितले.
दोन्ही वैमानिक सेवेतून तात्पुरते दूर
प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य वैमानिक आणि सहवैमानिक या दोघांनाही नियोजित उड्डाण सेवेतून दूर ठेवण्यात आले आहे. विमान अपघात तपासणी विभागाकडून दोन्ही वैमानिकांसह विमान कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
२० प्रवासी, चार कर्मचारी जखमी
४ ऑगस्ट रोजी फुकेटहून दिल्लीकडे येणाऱ्या या विमानात १३७ प्रवासी आणि आठ कर्मचारी होते. उड्डाणादरम्यान विमानाची उंची अचानक सुमारे ३०० फूटांनी कमी झाली. या प्रकारामुळे विमानात घबराट निर्माण झाली. या घटनेत २० प्रवासी आणि चार कर्मचारी जखमी झाले होते.
या संपूर्ण प्रकरणात मुख्य वैमानिकाच्या तपासणीचे निष्कर्ष, विमानाची उंची अचानक कमी होण्यामागील नेमके कारण आणि वैमानिकाच्या आरोग्याशी संबंधित बाबी यांचा तपास विमान अपघात तपासणी विभागाकडून केला जात आहे. चौकशीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.