फुकेट-दिल्ली विमानात पायलट फुल्ल तर्राट, गांजाच्या नशेत विमान उडवलं तर शिक्षा काय?
Phuket Delhi Flight Incident फुकेट-दिल्ली एअर इंडियाच्या विमानातील टर्ब्युलन्सच्या घटनेनंतर मुख्य पायलटच्या डोप टेस्टचा मुद्दा चर्चेत
Air India Pilot Drug Test DGCA Rules Explained : विमान उडवताना पायलटची एक छोटी चूकही शेकडो प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे पायलटच्या फिटनेस आणि नशामुक्ततेबाबत विमान वाहतूक क्षेत्रात अत्यंत कठोर नियम आहेत. फुकेटहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील टर्ब्युलन्सच्या घटनेनंतर मुख्य पायलटच्या डोप टेस्टचा मुद्दा चर्चेत आला आहे. रिपोर्टनुसार, पायलटच्या दुसऱ्या डोप टेस्टमध्येही गांजाच्या सेवनाची पुष्टी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत सुमारे डझनभर प्रवासी आणि काही क्रू मेंबर्स जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर पायलट डोप टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला किंवा नशेच्या अवस्थेत विमान उडवत असल्याचे सिद्ध झाले, तर त्याच्यावर नेमकी काय कारवाई होऊ शकते? त्याबद्दल जाणून घेऊया…
Air India ची मोठी कारवाई, गांजा प्रकरणानंतर सर्व वैमानिकांसाठी ‘डोप टेस्ट’ अनिवार्य
पायलटसाठी नशेबाबत नियम इतके कठोर का?
पायलटच्या निर्णयक्षमतेवर, प्रतिक्रिया देण्याच्या वेगावर किंवा विमान हाताळण्याच्या क्षमतेवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही पदार्थाचे सेवन गंभीर सुरक्षा उल्लंघन मानले जाते. यामध्ये दारू, गांजा, कोकेन, अफूसारखे अमली पदार्थ तसेच काही सेडेटिव्ह आणि झोपेच्या औषधांचा समावेश होऊ शकतो. केवळ पायलट नशेत असल्याचे दिसणे आवश्यक नाही. संबंधित तपासणीत प्रतिबंधित पदार्थ आढळल्यासही कारवाई होऊ शकते.
डोप टेस्ट पॉझिटिव्ह आली तर काय होते?
ड्रग स्क्रीनिंग टेस्टमध्ये संशयास्पद किंवा पॉझिटिव्ह निकाल आल्यास पायलटला तात्काळ फ्लाइंग ड्युटीपासून दूर केले जाऊ शकते. त्यानंतर नमुन्याची पुष्टी करण्यासाठी पुढील प्रयोगशाळा तपासणी केली जाते. पॉझिटिव्ह निकालाची वैद्यकीय तपासणीही केली जाऊ शकते. संबंधित पदार्थ डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधामुळे शरीरात आला आहे का, याचीही पडताळणी केली जाते. पॉझिटिव्ह निकालाची पुष्टी झाल्यास पायलटला वैद्यकीय तज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ किंवा डि-अॅडिक्शन आदींसारख्या प्रोग्रॅमसाठी पाठवले जाऊ शकते. त्यानंतर पुनर्वसन, निगेटिव्ह डोप टेस्ट आणि मेडिकल फिटनेस यांसारख्या प्रक्रियेतून जावे लागू शकते. याशिवाय संबंधित एअरलाइन आपल्या सेवा नियमांनुसार निलंबन, शिस्तभंगाची कारवाई किंवा नोकरी समाप्त करण्याचा निर्णय घेऊ शकते.
नोकरी, EMI नाही तर… एका भीतीने उडवली 94% कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची झोप; सर्वेक्षणातून खुलासा
दुसऱ्यांदा डोप टेस्ट पॉझिटिव्ह आली तर?
पुन्हा ड्रग टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास प्रकरण अधिक गंभीर मानले जाते. उपलब्ध नियमांनुसार, दुसऱ्या उल्लंघनासाठी पायलटचा परवाना तीन वर्षांपर्यंत निलंबित केला जाऊ शकतो. तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास पायलटचा परवाना रद्द होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत व्यावसायिक पायलट म्हणून पुन्हा उड्डाण करण्याचा मार्ग जवळपास बंद होऊ शकतो.
डोप टेस्ट करण्यास नकार दिला तर?
डोप टेस्ट करण्यास नकार देणेही गंभीर उल्लंघन मानले जाते. पायलटने तपासणी टाळण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर कारवाई होऊ शकते. पहिल्यांदा टेस्ट नाकारल्यास पायलटला ड्युटीवरून हटवले जाऊ शकते आणि नियमांनुसार त्याच्या परवान्यावर कारवाई होऊ शकते. पुन्हा टेस्ट नाकारल्यास दीर्घकाळ परवाना निलंबित होण्यापासून ते परवाना रद्द होण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते.
झोपेच्या गोळ्या घेतल्या तरी कारवाई होऊ शकते का?
इथे एक महत्त्वाचा फरक आहे. प्रत्येक झोपेची औषधे बेकायदेशीर नसतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेली काही औषधे कायदेशीर असू शकतात. मात्र, त्यामुळे पायलटला विमान उडवण्याची आपोआप परवानगी मिळत नाही. अनेक झोपेच्या औषधांमुळे गुंगी, चक्कर, प्रतिक्रिया देण्याचा वेग कमी होणे किंवा निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशी औषधे घेतल्यानंतर पायलट फ्लाइंग ड्युटीसाठी फिट आहे की नाही, हे महत्त्वाचे ठरते. वैध प्रिस्क्रिप्शन असले तरी पायलटने मेडिकल फिटनेसचे नियम पाळणे आवश्यक आहे.
गांजाच्या नशेत एअर इंडियाचा पायलट! फुकेट-दिल्ली विमानप्रकरणात धक्कादायक खुलासे
गांजा सेवन केल्यास कायदेशीर कारवाईही होऊ शकते
पायलटच्या डोप टेस्टमध्ये गांजाचे सेवन सिद्ध झाल्यास केवळ विमान वाहतूक नियमांनुसारच कारवाई होईल असे नाही. परिस्थितीनुसार NDPS Act, 1985 अंतर्गतही कारवाई होऊ शकते. गांजाचे सेवन, बाळगणे, खरेदी-विक्री किंवा वाहतुकीच्या प्रकरणात आरोपाचे स्वरूप आणि पदार्थाचे प्रमाण यानुसार शिक्षेची तीव्रता बदलू शकते. त्यामुळे पायलटसाठी परिणाम केवळ नोकरी किंवा परवान्यापुरता मर्यादित राहत नाही गुन्हेगारी कारवाईचीही शक्यता निर्माण होऊ शकते.
विमानातील प्रवासी जखमी झाल्यास प्रकरण अधिक गंभीर
जर नशेच्या प्रभावाखाली विमान चालवताना दुर्घटना झाली, प्रवासी जखमी झाले किंवा कोणाचा मृत्यू झाला, तर प्रकरण आणखी गंभीर होऊ शकते. अशा वेळी DGCAकडून परवाना निलंबन किंवा रद्द करण्यासोबतच पोलिस तपास आणि फौजदारी कारवाई होऊ शकते. नेमकी कोणती कलमे लागू होतील, हे दुर्घटनेचे कारण, पायलटची भूमिका आणि तपासात समोर आलेल्या पुराव्यांवर अवलंबून असते.
पायलटची नियमित तपासणी कशी होते?
पायलट आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेसाठी विमान वाहतूक क्षेत्रात विविध तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये प्री-फ्लाइट ब्रेथ अॅनालायझर टेस्ट महत्त्वाची आहे. उड्डाणापूर्वी पायलटने मद्यपान केलेले नाही, याची खात्री करण्यासाठी ही चाचणी केली जाते. याशिवाय ठराविक नियमानुसार क्रू मेंबर्सची रँडम डोप टेस्ट देखील केली जाते. या तपासणीत गांजा, कोकेन किंवा काही औषधांसारख्या पदार्थांची उपस्थिती तपासली जाऊ शकते. थोडक्यात काय तर, पायलटसाठी नशा किंवा फ्लाइंग क्षमतेवर परिणाम करणारे पदार्थ म्हणजे अत्यंत गंभीर उल्लंघन, डोप टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास तात्काळ फ्लाइंग ड्युटीपासून दूर करणे, मेडिकल तपासणी, निलंबन, परवाना निलंबित किंवा रद्द करणे आणि परिस्थितीनुसार फौजदारी कारवाईपर्यंत परिणाम होऊ शकतात. मात्र, एखाद्या विशिष्ट प्रकरणात अंतिम शिक्षा काय असेल, हे तपास, डोप टेस्टची पुष्टी, लागू विमान वाहतूक नियम आणि फौजदारी कायद्यांतर्गत सिद्ध झालेल्या आरोपांवर अवलंबून असते.