नोकरी, EMI नाही तर… एका भीतीने उडवली 94% कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची झोप; सर्वेक्षणातून खुलासा
सुमारे 70 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी गेल्यास सहा महिने किंवा त्यापेक्षा कमी काळच आपला खर्च भागवू शकत असल्याचं सांगितलं
Tata AIG General Insurance Survey : नोकरी जाण्याची भीती, दर महिन्याच्या EMIचा ताण किंवा भविष्यासाठी पुरेशी बचत नसण्याची चिंता… कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक तणावामागे ही कारणं सर्वसाधारणपणे सांगितली जातात. मात्र, एका नव्या सर्वेक्षणातून यापेक्षाही वेगळी आणि चिंताजनक बाब समोर आली आहे. अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चाची भीती तब्बल 94 टक्के कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सतावत असल्याचं समोर आलं आहे. नेमका हा सर्व्हे कुणी केला? त्यातून नेमकं काय समोर आलं? त्याबद्दल जाणून घेऊया…
कुणी केला सर्व्हे?
टाटा एआयजी जनरल इन्शुरन्सच्या अहवालानुसार, अचानक रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली किंवा मोठ्या उपचारांची गरज भासली, तर त्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होईल, अशी भीती मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना वाटत आहे. महागडे उपचार, वाढता हॉस्पिटल खर्च आणि मर्यादित बचत यामुळे वैद्यकीय आणीबाणी ही आर्थिक तणावाची मोठी कारणं बनली आहे.
94% कर्मचाऱ्यांना मेडिकल बिलाची चिंता
सर्वेक्षणातील 94 टक्के कर्मचाऱ्यांनी अचानक येणाऱ्या वैद्यकीय बिलामुळे आर्थिक दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली. लाइफस्टाइलशी संबंधित आजार, मानसिक आरोग्याच्या समस्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची चिंता यामुळे हा ताण आणखी वाढत असल्याचं अहवालातून दिसून आलं आहे. विशेष म्हणजे, नोकरी बदलताना किंवा नोकरी जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास ही चिंता अधिक तीव्र होते. कारण अशावेळी उत्पन्न थांबण्यासोबतच कंपनीकडून मिळणाऱ्या आरोग्य विम्याच्या कव्हरेजबाबतही अनिश्चितता निर्माण होऊ शकते अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे.
नोकरी गेली तर किती दिवस निभाव लागेल?
सर्वेक्षणातील आणखी एक आकडा कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या आर्थिक असुरक्षिततेकडे लक्ष वेधतो. सुमारे 70 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी गेल्यास सहा महिने किंवा त्यापेक्षा कमी काळच आपला खर्च भागवू शकत असल्याचं सांगितलं. तर, केवळ 12 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी नसतानाही एक वर्षापेक्षा जास्त काळ आर्थिकदृष्ट्या टिकून राहण्याचा विश्वास आहे. याचा अर्थ असा की, नोकरी गेल्यानंतर उत्पन्नाचा स्रोत बंद झाला आणि त्याच काळात एखादी मोठी वैद्यकीय आणीबाणी उद्भवली, तर अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभं राहू शकतं.
फक्त कंपनीच्या हेल्थ इन्शुरन्सवर अवलंबून राहणं कितपत योग्य?
कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कंपनीकडून आरोग्य विमा मिळत असला तरी, त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. कंपनी बदलल्यास किंवा नोकरी गेल्यास या कव्हरेजमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काही गोष्टींकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. यामध्ये कंपनीच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये नेमकं किती कव्हरेज आहे, हे तपासावे. पॉलिसीची कव्हरेज लिमिट, अटी आणि अपवाद समजून घेणेही महत्त्वाचे आहे. अचानक उपचारांचा खर्च भागवण्यासाठी स्वतंत्र इमर्जन्सी फंड तयार ठेवणे केव्हाही फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे स्वतःसह कुटुंबासाठी अतिरिक्त हेल्थ इन्शुरन्सचा विचार करा तसेच नोकरी बदलण्यापूर्वी जुन्या आणि नव्या कंपनीतील आरोग्य विम्याच्या नियमांची माहिती घ्यावी.