SBI च्या रिपोर्टनुसार RBI ऑक्टोबरमध्ये दणका देणार; गृहकर्जदारांना मोठ्या धक्क्याचे संकेत!
RBI May Be Hike Repo Rate In October घर, कार किंवा मुलांच्या शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
RBI May Be Hike Repo Rate In October : घर, कार किंवा मुलांच्या शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑक्टोबरमध्ये रेपो रेटमध्ये वाढ करू शकते, असा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. रेपो रेट वाढल्यास त्याचा परिणाम बँकांच्या कर्जदरांवर आणि विशेषतः फ्लोटिंग रेटवरील कर्जांच्या EMI वर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या कर्जाचा हप्ता भरणाऱ्या ग्राहकांना आपल्या मासिक बजेटचा पुन्हा आढावा घ्यावा लागू शकतो. नेमका SBI चा रिसर्च रिपोर्ट काय? त्याबद्दल जाणून घेऊया…
SBI च्या रिपोर्टमध्ये नेमकं काय सांगितलंय?
SBI Research च्या Ecowrap अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये RBI रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची (bps) वाढ करू शकते. एवढंच नाही तर, डिसेंबरमध्येही आणखी 25 bps वाढ होण्याचा अंदाज रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच वर्षाच्या अखेरीपर्यंत रेपो रेटमध्ये एकूण 50 bps म्हणजेच 0.50 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींची चिंता
रेपो रेट वाढण्यामागे महागाईचा दबाव हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. मध्य-पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून, त्या 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्याचा रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ चढ्या राहिल्यास वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढू शकतो. त्याचा परिणाम महागाईवर होण्याची शक्यता आहे. SBI Research च्या अंदाजानुसार, कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात न आल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर 6.5 टक्के किंवा त्याहून अधिक होऊ शकतो.
रेपो रेट वाढला तर तुमच्या EMI वर काय परिणाम होईल?
RBI रेपो रेट वाढवल्यास बँकांच्या कर्जाच्या व्याजदरातही वाढ होण्याची शक्यता असते. विशेषतः फ्लोटिंग रेटवर कर्ज घेतलेल्या ग्राहकांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. व्याजदर वाढल्यास दोन प्रकारे परिणाम होऊ शकतो एक म्हणजे EMI वाढू शकते किंवा कर्जाची मुदत वाढू शकते. नेमका परिणाम किती होईल, हे संबंधित बँकेने कर्जाच्या व्याजदरात किती बदल केला आहे, यावर अवलंबून असेल.
उदाहरणार्थ, गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा शिक्षण कर्जाचा हप्ता आधीच मासिक बजेटचा मोठा हिस्सा असेल, तर व्याजदरातील थोडी वाढदेखील वर्षभरात अतिरिक्त आर्थिक भार निर्माण करू शकते.
कर्जदारांनी आत्ताच काय करायला हवं?
रेपो रेटमध्ये संभाव्य वाढीच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांनी आपल्या कर्जाचा सध्याचा व्याजदर तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. आपलं कर्ज फ्लोटिंग रेटवर आहे की, फिक्स्ड रेटवर, हेही तपासावे. व्याजदर वाढल्यास EMI किती वाढू शकते, याची माहिती बँकेकडून आधीच घेता येईल. तसेच नवीन कर्ज घेण्याचा विचार असेल, तर वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर, EMI आणि कर्जाची एकूण परतफेड यांची तुलना करून निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते. SBI चा हा अंदाज प्रत्यक्ष निर्णय नाही. त्यामुळे RBI ऑक्टोबरमध्ये रेपो रेट वाढवते की नाही आणि वाढवत असल्यास किती, हे RBI च्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल.