Rahul Gandhi Gyanesh Kumar : दिल्लीतील महारॅलीत राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना पदावरून हटवले जाईल आणि तुरुंगात जावे लागेल, असा इशारा दिला. मतांची चोरी हा केवळ निवडणुकीतील गैरप्रकार नसून देशातील (Gandhi ) प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या हक्काची आणि आवाजाची चोरी असल्याचं सांगत त्यांनी या प्रकाराला देशद्रोह ठरवलं. देशातील सर्व घटनात्मक संस्थांवर सत्ताधाऱ्यांनी ताबा मिळवल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित राहावं लागत असून, तरुणांना रोजगार मिळत नाही आणि देशातील संपत्ती अंबानी-अदानी यांच्याकडे जात असल्याची टीका त्यांनी केली. हजारो कोटींची कर्जमाफी उद्योगपतींना मिळते; मात्र सामान्य माणसाने असं केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होते, असंही ते म्हणाले.
देशात प्रत्येकाला समान अधिकार मिळायला हवेत, शेतकऱ्यांना आपली स्वप्नं पूर्ण करता आली पाहिजेत आणि 18 तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षणासोबत रोजगाराच्या रूपाने मेहनतीचं फळ मिळालं पाहिजे, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त केली. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरून जाणार नाहीत, असं अमित शाह म्हणत असतील तर मोदी कुठेही जाऊ शकत नाहीत, असं सांगत राहुल यांनी शाह आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातही कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. तुम्ही पळून जाऊ शकत नाही, इथेच राहावं लागेल आणि कारवाईला सामोरं जावं लागेल, असं ते म्हणाले. मात्र, मोदी, अमित शाह किंवा ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल वैयक्तिक द्वेष नसून आपण प्रेमाची दुकान चालवणारे लोक आहोत, असंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.
राहुल गांधी म्हणाले की, प्रत्येक भारतीयाचा आवाज त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. देशातून द्वेष संपवण्याची गरज असून, नरेंद्र मोदी यांनी देशात द्वेष पसरवल्याचा आरोप त्यांनी केला. देशाला द्वेषापासून वाचवायचं आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला द्वेष नको, तर प्रेम आणि आपुलकी हवी आहे. संपूर्ण देश द्वेष दूर करून प्रेमाचा मार्ग स्वीकारू इच्छित आहे. पुन्हा एकदा देश योग्य दिशेने वाटचाल करणार असल्याचंही ते म्हणाले. या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांनी प्रेम आणि आपुलकीचा संदेश दिला आहे. त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा ज्ञानेश कुमार यांना नव्हे, तर देशाला संदेश दिला आहे.
ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी देशाचा गळा घोटण्याचा सर्वात मोठा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्यांना रात्री झोप लागणार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही झोप लागत नसल्याचं ते म्हणाले. मात्र, आपण द्वेष पसरवणारे लोक नसून देशात द्वेषाऐवजी प्रेम आणू इच्छितो, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. हे आंदोलन केवळ विरोध प्रदर्शन नसून संपूर्ण हिंदुस्तानचा आवाज आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी दिलेला हा आवाज असल्याचं त्यांनी नमूद केलं.
