राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, पुणे, सातारा, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Untitled Design   2026 09 28T084937.304

Untitled Design 2026 09 28T084937.304

Rainfall intensity to increase : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोर धरला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. काही भागांत मात्र पावसाचा जोर अधिक असून विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात मात्र ढगाळ वातावरणासह अधूनमधून ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! 28 ते 30 सप्टेंबरचा तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप स्थगित

दरम्यान, देशातील विविध भागांमध्ये सक्रिय असलेल्या हवामान प्रणालींमुळे आगामी काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बंगालच्या उपसागरात म्यानमारजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून उत्तर भारतातही एक हवामान प्रणाली विकसित होत आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्यास त्याचा परिणाम मध्य प्रदेशसह महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांतील हवामानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांत पावसाची तीव्रता वाढू शकते.

छत्तीसगड परिसरातील कमी दाबाची प्रणाली तसेच बंगालच्या उपसागरातील वातावरणीय घडामोडींमुळे पूर्व आणि मध्य भारतातील हवामानातही बदल होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत जाणवू शकतो. महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक वातावरण कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे तसेच शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार शेतीच्या कामांचे नियोजन करावे.

Exit mobile version