महाराष्ट्रात सप्टेंबरअखेरीस पुन्हा पावसाचा जोर वाढणार; विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचाही इशारा

मान्सून परतीच्या वाटेवर असताना दुसरीकडे बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

Untitled Design   2026 09 20T095853.438

Untitled Design 2026 09 20T095853.438

Rainfall intensity to increase : देशातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली, तरी महाराष्ट्रात मात्र पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. आगामी 3 ते 4 दिवसांत राजस्थान, पंजाब आणि सौराष्ट्र-कच्छच्या आणखी काही भागांतून मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे मान्सून परतीच्या वाटेवर असताना दुसरीकडे बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. उत्तर अंदमान समुद्र आणि परिसरातील चक्राकार वाऱ्यांमुळे कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

हे क्षेत्र अधिक तीव्र होत पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याचा आणि पुढील 3 ते 4 दिवसांत दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे जाण्याचा अंदाज आहे. याच प्रणालीचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावरही जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. 23 सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळू शकतो. यंदा मान्सूनने नेहमीच्या तुलनेत दोन दिवस उशिराने म्हणजे 19 सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून माघार घेण्यास सुरुवात केली. साधारणपणे 17 सप्टेंबरच्या आसपास मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो.

चॅट जीपीटीवर शोध, लोहगडाची रेकी अन् फेक इंस्टग्राम आयडी, केतन प्रकरणातील कथित कटाची संपूर्ण कहाणी

दरम्यान, 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्र आणि गोव्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अंतर्गत भागातही पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्येही मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज असून, अहिल्यानगरसह मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही पुढील काही दिवस पावसाची उपस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

विशेष म्हणजे 21 ते 28 सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा पाऊस सक्रिय होत असल्याने कोरड्या हवामानातून काहीसा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे एका बाजूला देशाच्या वायव्य भागातून मान्सून माघारी फिरत असताना महाराष्ट्रात मात्र सप्टेंबरच्या अखेरीस पावसाचा आणखी एक जोरदार टप्पा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

Exit mobile version