दीड महिन्यानंतर मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; 5 जिल्ह्यांतील 620 गावांना दिलासा
Marathwada Rain Update : दीड महिन्याच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाचे दमदार पुनरागमन झालं असून 620 गावांना पावसाने झोडपून काढले.
Marathwada Rain Update : मराठवाड्यात तब्बल दीड महिन्याच्या (Rain) खंडानंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. गौरी-गणपतीच्या काळात विभागातील 5 जिल्ह्यांतील 31 मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला असून, तब्बल 620 गावांना पावसाने झोडपून काढले. 18 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत विभागात 18.1 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, काही भागांत अतिवृष्टी झाली आहे.
बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहिला. बीडमधील घाटनांदूर, बर्दापूर, परळी, शिरसाळा आणि पिंपळगाव गाडे, लातूरमधील लातूर, रेणापूर व पळशी, तर नांदेडमधील लोहगाव, जवळगाव, मालेगाव, तलानी आणि निवघा मंडळात अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यात 13 तर हिंगोलीतील 5 मंडळांत जोरदार पाऊस नोंदविण्यात आला.
पावसाच्या या पुनरागमनामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी मराठवाड्यातील पावसाची तूट कायम आहे. सप्टेंबर महिन्यातील 17 दिवस पावसाविना गेल्यानंतर आतापर्यंत या महिन्यात 40.7 मि.मी. पाऊस झाला आहे. जून ते 18 सप्टेंबरपर्यंत विभागात 613.1 मि.मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात 423 मि.मी. पाऊस झाला असून, 190 मि.मी.ची तूट नोंदली गेली आहे.
18 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 41.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतर हिंगोली 38.0, नांदेड 19.5, लातूर 17.5, बीड 13.9, जालना 9.9, धाराशिव 5.8 आणि छत्रपती संभाजीनगर 5.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. विभागाची आतापर्यंतची पावसाची सरासरी 62 टक्क्यांवर असून, दीड महिन्यानंतर झालेल्या या पावसामुळे पिकांना काही प्रमाणात आधार मिळाला आहे.
18 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत कुठं किती झाला पाऊस?
छत्रपती संभाजीनगर — 5.4 मि.मी.
जालना — 9.9 मि.मी.
बीड — 13.9 मि.मी.
लातूर — 17.5 मि.मी.
धाराशिव — 5.8 मि.मी.
नांदेड — 19.5 मि.मी.
परभणी — 41.8 मि.मी.
हिंगोली — 38.0 मि.मी.
एकूण — 17.1 मि.मी.