Video : महाराष्ट्रात पावसाची स्थि काय? किती टक्के तूट; कोणत्या जिल्ह्यांची स्थिती चिंताजनक?
Maharashtra Rain Update : मराठवाडा आणि विदर्भाचा विचार केला तर जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट आहे.
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात सध्या सरासरीच्या (Rain) तुलनेत 16 टक्के पावसाची तूट आहे. विभागनिहाय पाहिल्यास मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात ही तूट अधिक आहे. सिंधुदुर्गसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत 30 ते 40 टक्क्यांपर्यंत पावसाची तूट नोंदवली गेली आहे. एक-दोन जिल्हे वगळता बहुतांश जिल्ह्यांतील पावसाची स्थिती चिंताजनक असल्याची माहिती हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी ‘लेट्सअप मराठी’शी बोलताना दिली.
मराठवाडा आणि विदर्भाचा विचार केला तर जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट आहे. आगामी काळात ही तूट भरून निघण्याची शक्यता कमी असल्याचे सध्याच्या हवामान स्थितीवरून दिसत आहे. मान्सूनचा कालावधी आता संपण्याच्या टप्प्यात आला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. आणखी काही काळ पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, त्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन सध्याची तूट भरून निघेल, असं चित्र नसल्याचं सानप यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात तातडीने दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, 9 मोठ्या मागण्या
राज्यात काही भागांत सध्या पाऊस होत असला तरी तो सर्वदूर नाही. एका भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होत असताना दुसऱ्या भागात पूर्णपणे कोरडे वातावरण दिसत आहे. सर्वत्र पाऊस देणारे ढग किंवा त्यासाठी पोषक वातावरण सध्या निर्माण झालेले नाही. गेल्या चार-पाच वर्षांपासून कमी कालावधीत अतिवृष्टी होणे किंवा काही भागांत पाऊस न पडणे, असे चित्र दिसत आहे. यामागे केवळ एक कारण नसून नैसर्गिक परिस्थिती आणि हवामानातील विविध बदलांचा एकत्रित परिणाम असल्याचे सानप यांनी सांगितले. पावसासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी अधिकाधिक झाडे लावणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, 20 ते 22 सप्टेंबरनंतर काही भागांत पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, अपेक्षित प्रमाणात पाऊस होईलच, असे ठोसपणे सांगता येणार नाही. या काळात पाऊस झाल्यास जलसाठ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो; मात्र सध्याच्या टप्प्यावर पाऊस झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असल्याचे सानप यांनी सांगितले. यंदा दुष्काळी स्थिती जाहीर करता येईल का, हे सरकार आपल्या निकषांनुसार ठरवते. तसेच स्वयंघोषित हवामानतज्ज्ञांकडून केले जाणारे अंदाज शेतकऱ्यांची दिशाभूल करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा अंदाजांवर विश्वास न ठेवता भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन सानप यांनी केले.