पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य शिबिर
Rahul Kalate-सेवा हीच साधना आणि समाजहित हाच संकल्प या भावनेतून नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नगरसेवक राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. याला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. एकाच दिवसात शेकडो नागरिकांनी इथे विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.
नगरसेवक राहुल कलाटे आणि समर्थ युवा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर वाकडमधील म्हातोबा नगर परिसरात आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात मॅमोग्राफीद्वारे स्तनांचा कर्करोग तपासणी, CBC रक्त तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
आरोग्य शिबिराला भेट देत नगरसेवक राहुल कलाटे यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या जाणून घेत, भविष्यातही परिसरात अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले, “सेवा हीच साधना आणि समाजहित हाच संकल्प या भावनेतून नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. आपल्या परिसरातील नागरिकांना वेळेवर आणि आवश्यक आरोग्य तपासण्या उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. अधिकतर ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला, ही समाधानाची बाब आहे. नागरिकांच्या आरोग्य व कल्याणासाठी यापूर्वीही अनेकदा आपण आरोग्य शिबिर राबविले आहेत. अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न येत्याकाळातही राहील.”
या उपयुक्त उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांचे कलाटे यांनी आभार मानले. नागरिकांनीही आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.